शहर व ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा वाढला
दुपारी वर्दळ कमी ; अडगळीतले कुलर निघाले बाहेर
सिन्नर :शहर व तालुक्यात गेल्या चार- पाच दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून पारा ३५ अंशापार गेला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे रस्त्यावरील दुपारची वर्दळ कमी झाली असून सहा ते सात महिन्यांपासून अडगळीला पडलेली कुलर आता बाहेर निघत आहे.
तालुक्यात होळी संपल्यानंतर सुर्याचा पारा चढत जातो, असा सर्वमान्याचे संकेत आहे. मात्र सिन्नर शहरासह तालुक्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुर्याचा पारा चढू लागला असून उन्हाचा पारा ३५ अंशापार गेला आहे. उन्हाची काहिली सिन्नरकरांना आत्तापासूनच असह्य होऊ लागली आहे. पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याला लवकरच सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून सुर्य आग ओकू लागल्याचे भासत आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहिली वाढत असल्याने नागरिकांनाही ती असह्य होऊ लागली आहे. शनिवारी तालुक्यात ३६अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी देखील ३६.१ अंश सेल्सिअस तापमान होते. यंदा मार्च महिन्यातच सुर्याचा पारा ३६ अंशापार गेल्याने एप्रिल आणि मे महिन्यात काय हाल होतील, याची चिंता सिन्नरकरांना लागली आहे. उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनीही दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे कमी केले आहे. आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. मुख्य बाजारपेठ वगळता तर इतर मार्ग दुपारच्या सुमारास ओस पडल्याचे दिसून येत आहे. दुपारची वर्दळ कमी झाल्याने सायंकाळी व रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. नागरिक आपल्या कुटुंबासह खरेदीसाठी सायंकाळीच घराबाहेर पडताना दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध उपाय करताना दिसून येत आहे. तोंडावर रुमाल, डोक्यावर टोपी घालणे सुरू केले आहे. त्यामुळे टोप्यांची दुकाने, गॉगल्सची दुकाने फुटपाथवर लागली आहे. याशिवाय शहरातील गल्लीबोळात फिरत्या रसवंत्या दिसू लागल्या आहेत.
चौकट : पाण्याची पातळी खालावली
उन्हाची काहिली वाढल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. नदी-नाले, तलाव आटण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील जलस्रोत असलेल्या विहिरी, बोअरवेल यांचे पाणीही कमी होत आहे. त्यामुळे यंदा पाऊस चांगला होऊनही लवकरच टंचाईचा सामना करावा लागतो की काय असा प्रश्न पडला आहे. काही ठिकाणी जोमात असलेली पिके उन्हामुळे सुकू लागली असून त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे.