नाशिक : मागील नऊ वर्षांत उन्हाची जेवढी तीव्रता नाशिककरांनी अनुभवली नाही, तेवढी यावर्षी अनुभवयास येत आहे. यंदा तापमानाचा पारा ४२.७ अंशापर्यंत पोहचल्याने मागील नऊ वर्षांमधील तापमानाच्या विक्रमाच्या सर्व नोंदी मागे पडल्या आहेत. यावर्षी नऊ वर्षांच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे.मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. १६ एप्रिल २०१० साली ४२ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. त्यानंतर नऊ वर्षांनी शनिवारी तापमानाचा पारा ४२ अंशापुढे सरकला.मागील पाच ते सहा दिवसांपासून शहरवासीयांना उन्हाच्या कडाक्याने हैराण केले असून हवामान खात्याकडून शनिवारी (दि.२७) पुन्हा उष्णतेची लाट येत्या सोमवारपर्यंत (दि.२९) कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस नाशिककरांना उष्णतेचा कहर अनुभवयास येण्याची दाट शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवणार असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेत उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्याच्या घरगुती उपाययोजनांवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.बुधवारपासून नाशिककर कडक्याच्या उन्हाचा सामना करत आहे. ३८ अंशांवरून तापमानाचा पारा थेट चाळिशीपार पोहचला. ४०.९ अंश इतके तापमान बुधवारी नोंदविले गेले तर गुरुवारी काही अंशी घट होऊन पारा ४०.५ अंशांवर स्थिरावला; मात्र शुक्रवारपासून अचानकपणे वातावरणात कमालीचा उष्मा वाढल्याने मागील दहा वर्षांपेक्षा अधिक तापमान शनिवारी नोंदविले गेले. दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर फारशी वर्दळ दिसून आली नाही. सूर्यास्तानंतरही नाशिककरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कारण कमाल तापमानासोबत किमान तापमानाचा पारादेखील मागील चार वर्षांपासून चढता असून किमान तापमान शुक्रवारी २३.२ अंश इतके होते; मात्र शनिवारी किमान तापमानही २८.६ अंशवर पोहचल्याने नागरिकांना रात्रीही प्रचंड उकाडा अनुभवयास आला. २८ मार्चमध्ये या हंगामात पहिल्यांदा पारा चाळीशीपार सरकला तर एप्रिलअखेर कमाल तापमानाची ४२.७ अंश ही विक्रमी नोंद ठरली.उन्हाच्या तडाख्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारपर्यंत उष्णतेची लाट : नऊ वर्षांमधील तापमानाचा विक्रम मोडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 6:23 PM
यावर्षी नऊ वर्षांच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले.
ठळक मुद्दे४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. एप्रिलअखेर ४२.७ अंश ही विक्रमी नोंद ठरली