लासलगाव : निफाड तालुक्यातील उगाव येथील ज्ञानेश्वर घमाजी नेहरे या शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात उष्माघाताने झालेला हा जिल्ह्यातील दुसरा बळी ठरला आहे. ज्ञानेश्वर नेहरे हे उगाव येथील भगवान पानगव्हाणे यांच्या द्राक्षबागेतील जुन्या तोडलेल्या द्राक्षबागेची लाकडे गोळा करण्याचे काम करत असताना दुपारी एक वाजेदरम्यान ते अचानक शेतातच कोसळले. त्यांना तत्काळ उपचारासाठी निफाड येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. वाढत्या उन्हामुळे निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील राहुल रायतेचा १८ एप्रिल रोजी उष्माघाताने मृत्यू झाला होता. त्यानंतर बारा दिवसांत तालुक्यातील उगाव येथील ज्ञानेश्वर नेहरे या शेतमजुराचा उष्माघाताने दुसरा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात तपमानाचा पारा सातत्याने वाढत असून, बहुतेक भागात पारा चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा पुढे गेला आहे. उन्हाने जिवाची लाहीलाही होत असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
उगाव येथील शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 1:39 AM