नाशिक : शहर व परिसराच्या मध्यवर्ती भागात रविवारी (दि. १७) दुपारी तीन वाजेपासून सव्वाचार वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पावसामुळे तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मागील तीन दिवसांपासून कडक ऊन पडू लागल्यामुळे अनेकांनी रेनकोट घरात ठेवणे पसंत केले असता रविवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने नाशिककरांना ओलेचिंब केले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा प्रभाव विदर्भासह मध्य, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाहावयास मिळेल. ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. शनिवारी पावसाने हजेरी लावली नाही; मात्र रविवारी दुपारी सव्वा तास चाललेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. रविवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. मध्यरात्रीपासून ढगाळ हवामान निर्माण झाल्याने किमान तापमानातही वाढ झाली होती. सकाळी २१.४ इतके किमान तर संध्याकाळी ३१.७ इतके कमाल तापमान नोंदविले गेले. दुपारी सव्वा तास झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याचा अनुभव नाशिककरांना आला. ६.१ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. दरम्यान, वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणही वाढले होते.