नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या तीन दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. तर काही भागात पावसाने नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.शेतात पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. नांदूरशिंगोटे परिसरातील गावांमध्ये दिवसाआड पावसाने हजेरी लावली आहे. मृग नक्षत्रात परिसरात पावसाने चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पिकांची लागवड व पेरणी केली होती. मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने बळीराजाने शेतातील अंतर्गत मशागतीचे कामे सुरू केली होती. पंरतु गेल्या तीन दिवसापासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.पावसाचे पाणी रस्त्यावरु न वाहत होते. पावसाच्या पाण्याने डोंगराच्या पायथ्याशी असलेले छोटे मोठे बंधारे व केटीवेअर भरले आहेत. तसेच काही भागात शेतात पाणी साचल्याने नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. नांदूरशिंगोटे परिसरातील गावांमध्ये मध्यम व हलक्या स्वरु पाच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांमध्ये आंनदाचे वातावरणात आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी जूनच्या मध्यवर्ती व जुलैच्या सुरु वातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन, बाजरी, मका या पिकांना पसंती दिली आहे.
नांदूरशिंगोटे परिसरात पावसाची जोरदार हजेरी; शेतीकामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 8:42 PM