विंचूर : परिसरातील गोंदेगाव, डोंगरगाव, हनुमाननगर येथील गावांना बुधवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपले. विंचूरसह परिसरात सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. येथील तुळशिराम जाधव यांचे वासरू वीज पडून ठार झाल्याची घटना घडली, तर धारणगाव येथील बँकेजवळ वीज कोसळली, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.दुपारी २ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह तब्बल एक तास मुसळधार पाऊस झाला. आजच्या पावसाने परिसरातील नाल्यांवरील बंधारे पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले तर शेतातूनही पाणी वाहिले. येथील पाटबंधारे विभागाच्या पर्जन्यमापक केंद्रात ११५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजच्या पावसाने काही प्रमाणात का होईना दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजास आधार मिळाला आहे. पावसाळा संपत आला तरी विंचूर व परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरीवर्ग चिंतातुर झालेला असतानाच विजेच्या कडकडाटासह सुमारे तास ते दीड तास मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे येथून जवळच असलेल्या हनुमाननगर येथील नाल्यास पूर आला. विंचूर येथील रस्त्यांवरून पाणी वाहत होते. मुसळधार पाऊस त्यात काळोख झाल्याने नाशिक औरंगाबाद महामार्गावरील काही वाहने थोडा वेळ थांबून पाऊस कमी झाल्यानंतर मार्गस्थ झाली. सध्या कांद्याची लागवड सुरू असल्याने झालेला पाऊस सदर पिकास पूरक असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.(वार्ताहर)
विंचूरसह परिसरात मुसळधार पाऊस
By admin | Published: September 16, 2015 10:57 PM