नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून परतीचा पाऊस कोसळत असल्याने नाशिककरांची तारांबळ उडाली असून, ग्रामीण भागात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सोमवारीही जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला म्हणजेच शनिवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. शनिवारी पहाटे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला तर रविवारी दिवसभर अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे दांडियाप्रेमींचा मात्र हिरमोड झाला. तर कालिका यात्रेतही विक्रेत्यांनी धावपळ झाली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या पावसामुळे उत्सवाची तयारी करणाऱया सार्वजनिक मंडळांच्या मेहनतीवर पाणी फिरले. रविवार सकाळपासूनच आभाळ दाटून आल्याने आणि वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दुपारी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात होती. दुपारी सुमारे दोन तास चांगलाच पाऊस झाला. अचानक परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना पिकांची चिंता लागली आहे. सोमवारीही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
शहर परिसरात मुसळधार पाऊस
By admin | Published: October 03, 2016 12:39 AM