नाशिक : शहरात जरी पावसाची रिपरिप सुरू असली तरी जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांमध्ये मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने धरणातून गोदापात्रात होणाऱ्या विसर्गामध्ये रविवारी (दि.२२) वाढ करण्यात आली आहे. आठवडाभरापासून गोदावरीला आलेला पूर काहीसा ओसरला जरी असला तरी पाण्याच्या पातळीत वाढ टिकून आहे.मागील सोमवारी (दि.१६) शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर धरणातून दिवसभर मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून या हंगामात पहिल्यांदाच वाहिली. नऊ हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविला गेला होता. हा विसर्ग २४ तास कायम ठेवण्यात आला होता; मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर बुधवारपासून विसर्ग कमी करण्यास सुरुवात झाली. हा विसर्ग दीड हजार क्यूसेक पर्यंत कमी करण्यात आला होता. पुन्हा पावसाचा धरण क्षेत्रात जोर वाढल्याने विसर्गही वाढविण्यात आला आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणातून गोदापात्रात चार हजार ३४२ क्यूसेक इतका विसर्ग सुरू होता; मात्र त्यानंतर विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आणि संध्याकाळपर्यंत पाच हजार ९३१ क्यूसेकचा विसर्ग सुरू होता. दुपारी ४ वाजेपर्यंत अहिल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे रामकुंडात सुमारे सात हजार ८३० क्यूसेक पाण्याचा प्रवाह सुरू होता. यामुळे नाशिकरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कं बरेपर्यंत पुराचे पाणी लागले होते. गोदाकाठावरील लहान मंदिरांना पाण्याचा वेढा पडल्याचे चित्र आहे. देवमामलेदार मंदिरासह गंगा-गोदावरी प्राचीन मंदिर, नारोशंकर मंदिर, नीळकंठेश्वर महादेव मंदिर, सांडव्यावरची देवी, खंडोबा मंदिरांभोवती पुराचे पाणी पोहचले होते. रविवारची सुटी असल्यामुळे शासकीय रोपवाटिका पूल, घारपुरे घाटपूल, अहिल्यादेवी होळकर पूल, संत गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर पुलावरून नाशिककरांनी संध्याकाळी नदीचा पूर बघण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शहरात दुपारपासून पावसाने उघडीप दिली होती. यामुळे अहिल्यादेवी होळकर पुलाखालून दुपारपर्यंत सात हजार ८३० क्यूसेक पाण्याचे प्रमाण संध्याकाळपर्यंत कमी झाले होते. शहरात रविवारी संध्याकाळपर्यंत अत्यल्प पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली आहे. सकाळपासून संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत ०.८ मिमी इतका पाऊस पडला. तसेच शनिवारी पहाटेपासून रविवारी पहाटे ६ वाजेपर्यंत २४ तासांत २१ मिमी इतका पाऊस नोंदविला गेला.
जोरदार पाऊस : गोदावरीची पूरपरिस्थिती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:40 AM