नाशिक: ज्या पावसाची बळीराजा आतुरतेने वाट पाहतो त्याच पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. इडा पिडा टळो अन बळीचे राज्य येवो असे म्हटले जाते. मात्र निफाड तालुक्यात बळीराजामागे लागलेली अवकाळी पावसाची इडा पिडा काही केल्या टळेना अशी अवस्था झाली आहे. विशेषत: तालुक्यात उगावसह अनेक ठिकाणी महत्वाचे पिक समजले जाणारे द्राक्षबाग मोठ्या संकटात सापडले आहेत. निफाडसह परिसरातील उगांव, शिवडी, खेडे, वनसगांव, सारोळे, नांदुर्डी, सोनेवाडी नैताळे रामपूर कोळवाडी शिवरे भागात सोमवारी दिवसभर कडक उन्हानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. सुमारे सव्वा तासाहून अधिक काळ पाऊसाचा जोर होता. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. सद्यस्थितीत द्राक्षबागांच्या छाटणीनंतर द्राक्षबागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत सतत पाऊस होत असल्याने द्राक्षबागेच्या पानांवर व घडांवर करपा डावणी यासारखे रोग बळावत आहेत. तसेच फुलोऱ्यातील द्राक्षमण्यांची गळ अन घडकुज या पावसाने होत आहे. दररोज हजार दोन हजार रुपयांच्या रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करायची अन पुन्हा पाऊसाने त्यावर पाणी फिरवायचे हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे द्राक्षबागेत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यातून फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर चालवणे मुश्किल होत आहे. बहुतांश वेळा दोन ट्रॅक्टरद्वारे फवारणी करावी लागत असून उत्पादक आता हतबल झाले आहेत. महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षबागांत असलेल्या मुळ्या बंद पडत आहे. त्याचा परिणाम थेट ओलांड्यावर फांदीला मुळ्या फुटत आहे. नवीन द्राक्षमाल जिरण्याचे प्रमाणही वाढत आहे .सोमवारी सायंकाळी सुर असलेल्या पाऊसाने द्राक्षबागंचे मोठे नुकसान झाले आहे .निफाड व लासलगाव परीसरात निमगाव वाकडा, टाकळी विंचुर, वेळापूर, ब्राम्हणगाव विंचुर, विंचुर, भरवस, गोंदेगाव, कोटमगाव, वनसगाव, खडकमाळेगाव, सारोळेखुर्द येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांनी त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे केली आहे.शिवडीचे द्राक्ष उत्पादक व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांनी पंचनामे लवकर व्हावेत अशी मागणी केली आहे. सततच्या पाऊसाने द्राक्षबागांवर येणाऱ्या संकटातून उत्पादकाला हातभार लावण्यासाठी शासनाने केवळ पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा द्राक्ष पीक विमा योजनेत आमूलाग्र बदल घडवून आणत छाटणीनंतरच्या एकशे पन्नास दिवसापावेतो विमा संरक्षण कसे मिळेल अशी व्यवस्था निर्माण करावी असे ऊगावचे द्राक्ष बागायतदार प्रभाकर मापारी यांनी बोलताना सांगितले.
मुसळधार पावसाचा द्राक्षं, कांद्यासह अन्य पिकांना फटका; शेतकरी संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 10:19 AM