मनमाड /नाशिक - मनमाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे 350 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शहरात शुक्रवारी रात्री दोननंतर पांझन नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले. या पुरामध्ये दोन दुचाकी, एक रिक्षा, पाच टपऱ्या वाहून गेल्या आहे. काही चारचाकी वाहने वाहिली असली तरी ती कडेला अडकल्याने सापडली आहेत. इदगाह , टकार मोहल्ला, आंबेडकर चौक भागातील नागरिकांना या पुराचा मोठा फटका बसला आहे.नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे तर अनेक घरांच्या पुढे ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या वाहून गेल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या दक्षिण व उत्तर भागाला जोडणाऱ्या इदगाह पूल वगळता अन्य सर्व पुलांवरून पाणी गेल्याने संपर्क तुटला होता. पालिकेचे मुख्यधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचाऱ्यांच्या पथकाने तात्काळ मदत कार्य सुरू केले.या भागातील साडेतीनशे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या नागरिकांची गुरुद्वारा, एच ए के हायस्कुल, मराठी शाळा आदी ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. पालिकेचे अग्निशमन केंद्र व गणेश कुंड सहा ते सात फूट पाण्याखाली होते. नदीकाठच्या दत्तमंदिर परिसरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. शहराशी संपर्क सुरू असलेला एकमेव इदगाह पुलाला हादरे बसत असल्याने हा पूलसुद्धा रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.