नाशिक : शहरासह जिल्ह्यात बुधवारी (दि.२१) हवामान विभागाकडून 'ऑरेंज ॲलर्ट' देण्यात आला होता. बुधवारी पहाटे तीन वाजेपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत २३.९मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद स्थानिक हवामान केंद्राकडून करण्यात आली. या हंगामात पहिल्यांदाच पावसाची दिवसभर दम'धार' सुरु राहिली. पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसनाशिकमध्ये होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशात दाटून येणाऱ्या ढगांवर खिळून राहत होत्या. मात्र ढगांची गर्दी ही हुलकावणी देत होती. अखेर वरुणराजाची नाशिकरांवर कृपादृष्टी होऊन मागील तीन दिवसांपासूनन हलक्या ते मध्यम सरींचा वर्षाव सुरु झाला. बुधवारी दमदार सरींची संततधार शहरात मध्यरात्रीपासून संध्याकाळी उशिरापर्यंत सुरु होती. यामुळे परिसर जलमय झाला होता. शहरातील रस्त्यांवरुन पाण्याचे पाट वाहू लागले होते. तसेच ठिकठिकाणी रस्ता खोदकामामुळष पावसाचे पाणी साचले होते. बकरी ईदची शासकिय सुटी असल्यामुळे चाकरमान्यांची पावसामुळे होणारी गैरसोय टळली. पावसाची दिवसभर संततधार सुरु राहिल्याने नाशिककरांना रेनकोटचा पुरेपुर वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता.