नाशिक : नाशिकमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शनिवारी रात्री 8.30 वाजेपासून रविवारी सकाळी 8.30वाजेपर्यंत सुमारे 55 मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
देव मामलेदार मंदिरासमोरील पुलावरून पाणी लागले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने गोदा काठालगत असलेल्या विक्रेत्यांना तातडीने स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरीच्या पात्रात पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे.