लोकमत न्यूज नेटवर्कमेशी : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील मटाणे, वरवंडी आदी गावांमधील सर्व खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत.यात उभे असलेले मका, भुईमूग, तूर, कांदा आदी पिके पाण्यात असल्याने काळी पडून सडू लागली आहेत. याशिवाय सोंगणी केलेल्या बाजरीचे कणीस शेतातच ढीग करून पडले असल्याने त्यावरून कापड टाकलेली झाकून ठेवल्यामुळे काळी कणसे होऊन अंकुर फुटलेत त्यामुळे बाजरीची पिके गेलीत. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता त्यामुळे दुष्काळी दुष्टचक्र सोसत असलेला शेतकरी राजास यावर्षी ओल्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने बळीराजाची धाकधूक वाढली आहे. भाजीपाला, कांदा पूर्णपणे खराब झाला आहे.कांदा उपटताना कांदा जमिनीत राहतो आणि फक्त पातच हातात येते. कांदे पूर्णपणे जमिनीतच सडला आहे. गुरुवारी रात्रभर झालेल्या पावसाने शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचलेले आहे. त्यामुळे जमीन खराब झाली आहे. डाळिंबबागा मर रोगामुळे नेस्तनाबूत होत आहे. सर्व शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मायबाप शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी यावेळी केली आहे.