नाशिक : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला तडाखा बसला असून, अनेक जनावरे मृत्युमुखी पडण्यासोबतच घरांची पडझड व शेतमालाच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.सटाणा : बागलाण तालुक्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या मान्सून पूर्व वादळी पावसामुळे पशुधन, घरे आणि डाळिंबबागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. सुमारे ६७ गायी, वासरे, शेळ्या-मेंढ्या मृत्युमुखी पडल्या तर ठिकठिकाणी २३ घरांची पडझड तसेच पत्रे उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, वादळी पावसामुळे कोटबेल, वीरगाव, फोपीर, नळकस, खिरमाणी, वनोली, आव्हाटी या भागातील डाळिंबबागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानग्रस्त भागाची गुरु वारी सकाळी पाहणी करून तातडीने पंचनामे व त्याचा अहवाल भरपाईसाठी शासनाकडे पाठवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला केल्या.शहरासह तालुक्यात बुधवारी सायंकाळपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. वादळामुळे बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. या वादळी पावसामुळे तालुक्यातील राहुड, वघानेपाडा, टिंगरी, श्रीपूरवडे, ढोलबारे येथील बारा शेतकºयांच्या सोळा गायी, बारा वासरे, शेळ्या, बोकड आणि मेंढ्या अशी ६७ जनावरे मृत्युमुखी पडून सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रथमिक अंदाज आहे. नामपूर, अजमीर सौंदाणे, तळवाडे दिगर, टिंगरी येथे प्रत्येकी चार, ढोलबारे पाच, ब्राह्मणगाव, ताहाराबाद, नरकोळ येथे प्रत्येकी एक अशा २३ घरांची पडझड तसेच घरांवरची पत्रे उडून अंशत: नुकसान झाल्याचा अंदाज आहे तसेच डाळिंबबागांसह कांदा व बाजरीचे उभे पीक भिजून शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे तरकोटबेल, फोपीर, खिरमाणी, नळकस, वीरगाव, आव्हाटी, वनोली येथे डाळिंब पिकाचे नुकसान झाले आहे. बहार घेतलेली डाळिंबाची झाडे भुईसपाट झाल्याने शेतकºयांना फटका बसला आहे.सिन्नर : तालुक्यात वादळी पावसामुळे वीज वितरण कंपनी व शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली. अनेकांच्या घरांचे पत्रे उडाले. शेकडो वृक्ष उन्मळून पडले. सर्वाधिक नुकसान वीज वितरण कंपनीचे झाले. सुमारे ७० विजेचे खांब पडल्याने रात्रभर तालुका अंधारात होता.गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयासह पावसाचे सिन्नर तालुक्यात आगमन झाले. नांदूरशिंगोटे, दापूर या भागात वादळ व पावसाचा जोर जास्त होता. शहरासह ग्रामीण भागात अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडल्यामुळे मोठे नुकसान झाले. वादळी वाºयामुळे अनेकांच्या घरांचे, गोठ्याचे पत्र उडून पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तहसीलदार राहुल कोताडे यांच्यासह प्रशासकीय अधिकाºयांनी अगोदरच सर्वांना दक्षतेचा इशारा देत दुपारी २ वाजेपर्यंत आपली दुकाने व व्यवसाय बंद करून घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांनी काळजी घेतल्याने जीवितहानी झाली नाही.साडेपाच वाजेच्या सुमारास सर्व तालुकाभर वादळी पावसाला प्रारंभ झाला. काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता, तर उर्वरित भागात विजेचा लपंडाव सुरू होता. सुमारे८ वाजेपर्यंत वादळी पावसाचा जोर होता. ग्रामीण भागात मका, टमाटे, डाळिंबबागांचे नुकसान झाले. पावसापेक्षा वादळाचा जोर असल्याने पत्रे उडून नुकसान होण्याचे प्रमाण जास्त होते. विंचूरदळवी ग्रामपंचायत प्रशासनाने धोकादायक घरातील नागरिकांना प्राथमिक शाळा व मंदिरात अगोदरच स्थलांतरित केले होते. जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात होती.वावी व कहांडळवाडी या भागात अनेक वृक्ष उन्मळून पडले. कहांडळवाडी येथील रावसाहेब राजेभोसले यांच्या डाळिंब बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील सर्वच भागात वादळ व पावसाचा जोर होता. रात्री ८ वाजेनंतर पाऊस व वादळ थांबल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मका पीक मोठ्या प्रमाणात होते. डुबेरे, पांढुर्ली, ठाणगाव या भागात वादळी वाºयाने मका पिकाचे नुकसान झाले.
वादळी पावसाचा जिल्ह्याला तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 9:37 PM