नाशिक : शहरात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाच्या आगमनामुळे नवरात्रोत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या देवीभक्तांचा काही प्रमाणात हिरमोड झाला. रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी कायम होत्या. गेल्या तीन ते चार दिवसांपासून हवामानात बदल झाला असून, रात्री गार हवा, तर दिवसा प्रचंड उकाडा जाणवत आहे. हवामान खात्याने ४८ तासांत अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली असतानाच सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक शहरासह उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. आकाशात ढगांची गर्दी होऊन क्षणार्धात काळोख पसरल्याने सायंकाळी नोकरीनिमित्त घरी जाणाºयांची तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रचंड धावपळ उडाली. सुमारे तासभर कोसळलेल्या पावसाने जागोजागी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. नवरात्रोत्सव एका दिवसावर येऊन ठेपल्यामुळे उत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या देवीभक्तांचा पावसामुळे काही प्रमाणात हिरमोड झाला. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही काही ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथे सायंकाळी पाच वाजेपर्यंत २० मिलीमीटरची नोंद करण्यात आल्याने गंगापूर धरणाच्या पाण्यावर पाटबंधारे खाते लक्ष ठेवून आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाणी सोडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 11:53 PM