वैतरणानगर : पावसाचे माहेर घर आणि भाताचे आगार म्हणुन प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी तालुका महिनाभर भाताच्या लावणीचा प्रतीक्षेत होता, मात्र सोमवारी सायंकाळपासुन सुरू झालेल्या संततधारेने बळीराजा सुखावला आणि भात लावणीची लगबग अखेर सुरू झाली. मात्र अनेक ठिकाणी लावणीसाठी मजुर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.इगतपुरी तालुक्यासह वैतरणा परिसरात भाताच्या पेरण्या करून तब्बल महिना उलटुन गेला होता. पाऊस पडत नसल्याने लावणी करायची कशी, लावणी केली नाहीतर पेरणी केलेले रोपे पुर्णपणे वाया जाणार या चिंतेत शेतकरीवर्ग असतांनाच संततधार सुरू झाली. त्यामुळे शेतामध्ये चिखल करत भात लावणीला मोठ्या प्रमाणात वेग आल्याचे दिलासादायक चित्र बघायला मिळाले. लाँकडाऊनमध्ये बागायती शेतीचे मोठे नुकसान झाल्याने भात लावणीसाठी मजुरांना द्यावे लागणारे पैसे उभे करायचे कसे असा प्रश्न समोर असताना बहुतांशी शेतकऱ्यांनी घरच्या सदस्यांच्या मदतीनेच लावणी करायला पसंती दिली आहे. कोरोनामुळे बाहेर गावच्या मजुरांना लावणीसाठी आणणे जिकरीचे झाल्याने गावातील व शेजारील गावातीलच मजुरांना लावणीसाठी बोलावले जात आहे. पाऊस उशिराने आल्याने सर्वच मजुर, शेतकरी यांची एकाच वेळेस भात, नागली, वरई लावणी सुरू झाल्याने मजुरांची वाणवा जाणवत आहे. काल मध्यरात्री पासुन मुसळधार पाऊसाच्या सरी बरसत असल्याने शेतीच्या कामांना वेग तर आलाचा धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाने धरणाच्या पाणी पातळीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे.
वैतरणा परिसरात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 2:00 PM