जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये झाली आहे.शेवगे, सातारे, एरंडगाव, पिंपळगाव लेप, जऊळके परिसरात बुधवारी (दि.३०) विजांचा कडकडाट, वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. सतत पंधरा दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यात प्रामुख्याने मका, सोयाबीन, पोळ कांदा ही नगदी पिके उद्ध्वस्त झाली आहेत, तर कापणी केलेल्या मका, सोयाबीनला कोंब येऊन चारा पूर्ण सडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.तालुक्यातील जवळपास सर्वच परिसरात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप हंगामातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे यंदाची बळीराजाची दिवाळी अंधारातच गेली. पश्चिम भागातील जळगाव नेऊर, शेवगे, सातारे, पिंपळगाव लेप, जऊळके, पुरणगाव, नेऊरगाव, एरंडगाव भागात मोठ्या प्रमाणावर मका, कांदा, सोयाबीन, कपाशी पिके परतीच्या पावसाने खराब झाली आहेत.
येवला तालुक्यात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 9:52 PM