कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यापासून तर थेट उत्तर-मध्य व दक्षिणेच्या काही भागात अचानकपणे कमी दाबाचा पट्टा विरला गेला आहे. यामुळे राज्यातील वातावरणावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. कधी उकाडा तर कधी ढगाळ हवामान तर कधी पाऊस अशा विचित्र वातावरणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रालाही अवकाळी पावसाने मागील तीन दिवसांत झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील निफाड, कळवण, सटाणा यांसारख्या तालुक्यांत अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.
शहरात सोमवारी सरींचा वर्षाव झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा पहाटे व संध्याकाळी मेघ दाटून आले आणि कोठे मध्यम तर कोठे हलक्या सरी कोसळल्या.
शहराच्या मध्यवर्ती भागासह इंदिरानगर, वडाळा, पंचवटी, अशोकामार्ग, काठेगल्ली, आनंदवली या परिसरात पावसाने काही मिनिटे हजेरी लावल्याने रस्ते ओले झाले होते. संध्याकाळी साडेपाच वाजेपासून शहरासह वरील उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली. यानंतर पुन्हा लख्ख सूर्यप्रकाश पडल्यामुळे वातावरणात पुन्हा वेगाने उकाडा वाढला होता. रात्री नागरिकांना अधिकच उष्मा जाणवला. मंगळवारी शहराचे कमाल तापमान ३४.५ तर किमान तापमान १७.६ अंश इतके नोंदविले गेले. शहर व परिसरात पुढील काही तास अशाप्रकारे तुरळक सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
--इन्फो--
पुढील २४ तासांत ‘अवकाळी’चे संकट टळेल
कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यापासून तर थेट उत्तर-मध्य व दक्षिणेच्या काही भागात अचानकपणे कमी दाबाचा पट्टा विरला गेला आहे. यामुळे राज्यातील वातावरणावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. कधी उकाडा तर कधी ढगाळ हवामान तर कधी पाऊस अशा विचित्र वातावरणाचा अनुभव राज्यात नागरिकांना येत आहे. दरम्यान, अवकाळीचे संकट पुढील २४ तासांत दूर होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. बुधवारी संमिश्र वातावरण असेल. चक्रीय चक्रवात विदर्भ आणि छत्तीसगडच्या दक्षिणेच्या दिशेने फिरल्यामुळे अवकाळीचे ढग दाटण्याची शक्यता हळुहळु कमी होत जाईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.