देवळा : येथील रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याने सुरू असलेली ट्रॅक्टरसारख्या अवजड वाहनांची वाहतूक नगर पंचायतीने देवळा वाजगाव रस्त्याच्या बाजूकडून चारी करून बंद केल्यामुळे कॉलनीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच नगर पंचायतीतर्फे तातडीने कारवाई करण्यात आली. देवळा नगर पंचायत हद्दीत प्रभाग क्र. १६मध्ये वाजगाव व कळवण या मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी रामराव हौसिंग सोसायटी ही कॉलनी आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातून खर्डा - देवळा रस्त्याने बाजार समितीत कांदा विक्रीसाठी येणारे ट्रॅक्टर, पिकअप आदी वाहने कॉलनीपासून १०० मीटर अंतरावर असलेल्या देवळा शहराकडील देवळा - कळवण या मुख्य रस्त्याने कांदा मार्केटकडे न जाता शॉर्टकट म्हणून रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याचा वापर करत होते. यामुळे दिवसभर रामराव हौसिंग वसाहतीत ट्रॅक्टर, पीकअप, बैलगाडी, रिक्षा आदी वाहनांची दिवस - रात्र वर्दळ सुरू असे. दिवसभरात दोनशे वाहने या कॉलनी रस्त्याने जात. यामुळे कॉलनीतील शांतता भंग झाली होती. या वाहनांमुळे सर्वत्र धूळ उडत असे. धूळ व ध्वनी प्रदूषणाचा येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
---------------------------------
जेसीबीने रस्ता बंद
या रस्त्याने शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची कॉलनी रस्त्याने सुरू असलेली वाहतूक बंद करावी, अशी मागणी रामराव आहेर गृहनिर्माण संस्थेने देवळा नगर पंचायतीकडे निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेत शुक्रवारी नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने देवळा - खर्डा रस्त्याच्या बाजूने कॉलनीच्या प्रवेशद्वारासमोर चारी करून रस्ता बंद करण्याची कार्यवाही केली.
------------------------------
रामराव हौसिंग सोसायटीतील रहिवाशांनी केलेल्या मागणीनुसार नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कॉलनी रस्त्याने होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद केली आहे. या कॉलनीच्या प्रवेश मार्गावर नगर पंचायतीमार्फत लवकरच सूचनाफलक लावण्यात येतील.
_ संदीप भोळे, मुख्याधिकारी, नगर पंचायत देवळा
------------------------
फोटो - देवळा नगर पंचायतीच्या वतीने कॉलनी रस्त्याने होणारी अवजड वाहनांची वाहतूक जेसीबी मशीनने चारी करून बंद करण्यात आली. (१७ देवळा १/२)
160721\16nsk_3_16072021_13.jpg
१७ देवळा १/२