सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मुरुमाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे परिसरातील रस्त्यांची दूरवस्था होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मनेगाव ग्रामस्थांनी मुरुमाची अवजड वाहतूक करणारी वाहने अडवून निषेध नोंदविला.
शिवार रस्त्यांसह मनेगाव ते बायपासपर्यंत रस्ता नादुरुस्त झाला असून, त्याबाबत ठोस आश्वासन मिळेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. ग्रामस्थांच्या संतापानंतर वाहतूक तूर्त थांबविण्याचा निर्णय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी धोंडवीरनगर, मनेगाव शिवारातील खासगी जमीन मालकांकडून मुरूम खरेदी करण्यात आला आहे. त्याची अवजड वाहनांद्वारे वाहतूक केली जाते. या वाहनांमुळे शिवार रस्त्यांसह मनेगाव ते बायपासपर्यंतचा मार्ग नादुरुस्त झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याचे डांबर निघून जाऊ लागले आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याची दुरुस्ती करून देण्याबाबत महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीकडून आश्वासन मिळेपर्यंत वाहतूक बंद ठेवावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी वाहने अडवली. मनेगावचे उपसरपंच अॅड. सी. डी. भोजने , धोंडवीरनगरचे सरपंच शिवाजी सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, भानुदास सोनवणे आदींनी मुरूम उपसा होत असलेल्या जागेची पाहणी केली. या ठिकाणी हद्दीपेक्षा जास्त उपसा होत असल्याचा ग्रामस्थांना संशय आहे. त्यासाठी हद्द निश्चित करू न मगच उपसा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. हद्द निश्चिती केल्यानंतरच मुरूम उपसा करू देण्याचा निर्णय घेण्यात आला.
फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथे अडवण्यात आलेली मुरुमाची वाहतूक करणारी अवजड वाहने. (१६ सिन्नर १)
===Photopath===
160321\16nsk_17_16032021_13.jpg
===Caption===
१६ सिन्नर १