ममदापूर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. गेली तीन वर्षे भीषण दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे या भागातील राजापूर, ममदापूर, सोमठाण जोश, देवदरी, खरवंडी, रहाडी या गावांना जानेवारी महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. परंतु या वर्षी पर्जन्यवृष्टी चांगली राहिल्याने मार्च महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ममदापूरचे सरपंच व ग्रामसेवक यांनी आठ दिवसांपूर्वी माहिती लेखी स्वरूपात देऊनदेखील कुठल्याही प्रकारची दखल ग्रामपंचायत सरपंच घेत नसल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. ममदापूर सरपंचदेखील महिला असल्याने त्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. राजापूर, ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही पिण्याच्या पाण्यासाठी मार्च महिन्यातच टंचाई निर्माण झाली असून, या परिसरात एकही मोठा बंधारा किंवा धरण नाही त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनदेखील पावसाचे पाणी वाहून जाते तेव्हा या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला प्रत्येक वेळी सामोरे जावे लागत आहे. या परिसरात कुठल्याही पाटाचे किंवा पाटचारीचे पाणी येत नाही त्यामुळे या भागात लवकरात लवकर पिण्याच्या पाण्यासाठी वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातून होते आहे. (वार्ताहर)
येवला तालुक्यात तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: March 21, 2017 11:58 PM