नांदगाव : लोहशिंगव्याचा हेला (रेडा) भालूरच्या विहिरीत पडला आणि गावात एकच कल्लोळ उडाला. एरवी मांजर, कुत्रा, हरीण व बिबट्या विहिरीत पडल्याच्या घटना घडत असतात, पण हेला विहिरीत पडल्याची घटना दुर्मीळ असल्याने, अख्खे गाव हे दृश्य बघायला लोटले. अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जेसीबीच्या साहाय्याने या हेल्याला बाहेर काढण्यात यश आले.
शनिवारी सायंकाळी शेतात चरत चरत हेला भालूरचे शेतकरी दत्तात्रय निकम यांच्या शेतात शिरला आणि गवतामध्ये दडलेल्या विहिरीत जाऊन पडला. काहीतरी पडल्याच्या आवाजाने निकम कुटुंब विहिरीकडे धावले. आतमध्ये डोकावल्यावर हेल्याचे २०० ते ३०० किलो वजनाचे धूड दिसले. डोके वर काढून पाण्यात पाय मारणारा व मदतीसाठी वर बघणारा हेला बघून सगळ्यांची मने हेलावली.
त्याला वर काढायची जबाबदारी कोणी घ्यायची? वनविभाग, ग्रामपंचायत की आपत्ती व्यवस्थापनाची यावर बराच खल झाला. अखेर ग्रामस्थांनी चारही बाजूंनी विहिरीत दोर सोडले, काही जणांनी खाली जाऊन हेला दोराला बांधला. हुप्पा...हुय्या करून प्रयत्न केला. काठापर्यंत कसेबसे त्याला वर ओढले, पण त्याचे वजन माणसांच्या ताकदीपुढे भारी पडत होते. शेवटी जेसीबीच्या हुकात त्याला बांधलेले दोर अडकविले आणि चार तासांनंतर रात्री दहा वाजता त्याला बाहेर काढण्यात यश आले.
इन्फो
देवाला वाहिलेला हेला
दोर सोडताच हेला आपल्या गावाकडे मार्गस्थ झाला. कोंडवाडे बंद झाल्याने गावागावात मोकाट फिरणारी कुत्री, गायी, गोऱ्हे, अनियंत्रित झाले आहेत. वर्दळीच्या रस्त्यावर ठाण मांडून बसलेली जनावरे आणि भाजी विक्रेत्यांच्या भाजीत तोंड खुपसणारी जनावरे हे ग्रामीण भागातले नेहमीचे दृश्य असते. श्रद्धेने त्यांना पोळी, भाकरी खाऊ घालणाऱ्या कुटुंबांची संख्याही कमी नाही. लोहशिंगवे येथे ग्रामस्थांनी देवाला काही हेले सोडले आहेत. गावात, शेतात भटकंती करून ते त्यांचे पोट भरतात. त्यातीलच एक हेला वाट चुकला आणि विहिरीत पडला.
फोटो- २० नांदगाव हेला