नाशिक : पोलीस नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी खणखणला... ‘हॅलो, पोलीस कंट्रोल रूम, मी चुंचाळे गावातून बोलतोय, राहत्या घरात गळफास लावणार आहे..., फोन कट होतो... पोलीस नियंत्रण कक्ष गांभीर्य ओळखून तातडीने हा ‘कॉल’ पुढे अंबड पोलीस ठाण्याला बिनतारी संदेश यंत्रणेवरून ‘पास’ करतात. तत्काळ वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी पथकासह चुंचाळे गावाकडे रवाना होतात. एक जीव वाचवायची संधी पोलिसांकडे असते म्हणून पोलीस वाहनचालक सायरन वाजवित वाऱ्याच्या वेगाने स्पर्धा करत महामार्गावरून जीप दामटवितो.दोन भावांमधील घरगुती कौटूंबिक वाद विकोपाला जाऊन एक भाऊ थेट टोकाची भूमिका घेत आपले जीवन संपविण्याची तयारी करतो. तत्पुर्वी तो याबाबतची माहिती स्वत:हून ‘१००’क्रमांकावर संपर्क करून पोलीस नियंत्रण कक्षाला कळवितो. घटनेची माहिती नियंत्रण कक्षातून थेट अंबड पोलिसांना दिली जाते. पोलीस प्रसंगावधान राखून वेळीच घटनास्थळी पोहचतात. दत्तनगरमधील ‘त्या’ बंद घराजवळ जाऊन ‘आम्ही पोलीस आहोत, तुला मदत करायला आलो आहोत, दार उघड.. आत्महत्त्या करू नकोस’ अशी आरोळी देतात; मात्र घरातून फारसा जलद प्रतिसाद मिळत नाही. पोलीस पुन्हा प्रयत्न करतात. त्याचवेळी कानी काहीतरी वस्तू पडल्याचा आवाजही येतो अन् पोलीसांच्याही मनात धस्स होते, पण दरवाजा तो युवक उघडतो. पोलीस ताडकन घरात प्रवेश करतात आणि त्या युवकाला सुरक्षित बाहेर आणतात. त्याने घराच्या छताला नायलॉन दोरी वगैरे अडकून आत्महत्त्येची तयारी केलेली होती, असे परोपकारी यांनी सांगितले. पोलिसांनी त्या युवकाला अंबड पोलीस ठाण्यात आणून त्याच्या कुटुंबीयांनाही बोलावून घेत मतपरिवर्तन करून समुपदेशन केले. युवकाचे प्राण वाचिवल्या बददल त्याच्या कुटूबियांनी पोलिसांचे मानले आभार. या पथकात पोलिस हवालदार शांताराम शेळके, नितीन राऊत, योगेश रेवगडे, सुखदेव गिरे आदी कर्मचारी सहभागी होते.पोलिसांनी चौकशी केली असता तो युवक म्हणाला, ‘भाऊ मला घर देत नसल्यामुळेच मी आत्महत्या करणार होतो’ पोलिसांनी त्याचा भाऊ आणि कुटुंबियांची बैठक घेतली. या वेळी आत्महत्या करण्यास निघालेल्या युवकाचा घराचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्याच्या भावाने पोलिसांसमोर दिले आणि भावाला वाचविल्याबद्दल पोलिसांना ‘थॅँक्स’ म्हटले.
‘हॅलो कंट्रोल रूम, मी राहत्या घरात आत्महत्त्या करतोय...’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 2:12 PM
दत्तनगरमधील ‘त्या’ बंद घराजवळ जाऊन ‘आम्ही पोलीस आहोत, तुला मदत करायला आलो आहोत, दार उघड.. आत्महत्त्या करू नकोस’ अशी आरोळी देतात; मात्र घरातून फारसा जलद प्रतिसाद मिळत नाही. पोलीस पुन्हा प्रयत्न करतात. त्याचवेळी कानी काहीतरी वस्तू पडल्याचा आवाजही येतो अन्
ठळक मुद्देभावाला वाचविल्याबद्दल पोलिसांना ‘थॅँक्स’ म्हटले.नायलॉन दोरी वगैरे अडकून आत्महत्त्येची तयारी केलेली होती