नाशिक : शरणपूररोड सिग्नलजवळ शुक्रवारी सकाळी अचानक बाप्पा अवतरले आणि सगळ्यांच्याच नजरा गणरायांचे ‘वक्रतुंड’ न्याहाळताना दिसू लागल्या. यात अनेकजण विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचाही समावेश होता. यावेळी पोलिसांच्या वाहतूक शाखेने विनाहेल्मेट दुचाकीचालकांना हेरून त्यांच्याकडून त्यांच्याच स्वत:च्या सुरक्षेसाठी गणपती बाप्पांची अनोखी आरती वदवून घेतली. यावेळी वाहनचालकांनी ‘हेल्मेट मी घालीन, सिग्नल मी पाळीन, झेब्राला थांबीन, शिस्त मी पाळीन’ ही आरती घेऊन स्वत:च्याच सुरक्षेसाठी गणरायासमक्ष संकल्प केले.वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब नाशिक पोलिसांकडून होत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दुचाकीस्वारांनी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा, यासाठी नाशिक शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने शुक्रवारी तीन तरुणांना गणपती बाप्पांचा पेहराव करून शहरातील विविध ठिकाणी विनाहेल्मेट दुचाकीचालकांकडून गणपती बाप्पांची आरती करून घेतली. विशेष म्हणजे ही नियमित आरती नव्हे तर आरतीच्या स्वरूपातील प्रतिज्ञाच असून, हीच प्रतिज्ञा पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकीचालकांकडून वदवून घेतली. नियम मोडणाºया चालकांना थांबवून त्यांच्या तोंडून आरतीच्या रचनेतील प्रतिज्ञा वदवून घेतली. या आरतीच्या माध्यमातून स्वत:च्या सुरक्षेसाठी मला हेल्मेट घालण्याची, सिग्नल पाळण्याची, शिस्त व वाहतूक नियमांचे पालन करण्याची हॉर्नच्या कर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषण न करण्याची व सीट बेल्ट लावण्याची सद्बुद्धी दे, अशी मागणी गणरायांकडे करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील व अन्य शहर पोलीस व वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘हेल्मेट मी घालीन, सिग्नल मी पाळीन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:29 AM