अनेक ठिकाणी हेल्मेट सक्ती आहे, अनेक ठिकाणी ती पाळली जात नाही. तसेच पुण्यासारखी अशी बरीच शहरे आहेत जिथे हेल्मेट सक्तीच नाहीय. जिथे सक्ती आहे तिथे आपला जीव वाचविण्यासाठी नाही तर पोलिसांपासून वाचण्यासाठी हेल्मेट घातले जाते. तसाच काहीसा रोख असलेला युक्तीवाद आज शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे.
हेल्मेट खरेदीवेळी या गोष्टी नक्की पहा; दंड तर वाचेलच पण...
आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ही बाईक रॅली पार पडली. मात्र, या रॅलीत वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
रॅलीत सहभागी झालेले मंत्री गिरीश महाजन तसेच कार्यकर्त्यांनी डोक्यावर हेल्मेट न घालताच दुचाकी चालवली. यावर मंत्री गिरीश महाजन यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. तेव्हा नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती नाही, म्हणून हेल्मेट घातले नाही, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली. सगळेच लोक विनाहेल्मेट आहेत, म्हणून हेल्मेट घातले नाही, असे महाजन म्हणाले.
आता हेल्मेट न वापरणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन काही एकटे नाहीत. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विनाहेल्मेट दुचाकी चालविल्या आहेत. आता हेल्मेट हे कशासाठी घालायचे? सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी घालायचे की नाही, सामान्यांनाच सक्ती कशासाठी आदी प्रश्न हे अनेकदा लोकांना जिवापेक्षा मोठे वाटतात. परंतू, जेव्हा अपघाताची वेळ येते आणि मार लागतो किंवा जीव जातो तेव्हा लोकांना हेल्मेट असले तर... असा पश्चाताप होतो.