नाशिक : अन्न, पाणी आणि निवारा या मनुष्याप्रमाणेच पशुपक्ष्यांच्यादेखील मूलभूत गरजा आहेत. मनुष्याला त्या सहज मिळविता येतात; परंतु पशुपक्ष्यांना संघर्ष करावा लागतो. सध्या उन्हाळा सुरू असल्याने अन्न-पाण्याअभावी अनेक पक्षी मरून पडलेले दिसतात. पक्षी संवर्धन संस्थेने विविध शाळांमधील मुलांच्या सहकार्याने पक्ष्यांसाठी घरटे बनवून त्यांना खाद्य आणि पाणी देण्याची व्यवस्था केली. या सेवाभावी उपक्रमाला आज हजारो मुले आणि कार्यकर्त्यांचे हात लागले आहेत.सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, पशुपक्ष्यांना चारापाण्याची व्यवस्था करावी या भावनेतून अनेक सामाजिक संस्था, संघटना कार्य करीत आहेत. तरीही हा उपक्रम आणखी व्यापक व्हायला हवा, असे पक्षिमित्र संवर्धन संघटना या राज्यपातळीवरील संस्थेला वाटते. त्यातून या संस्थेचे नाशिकमधील संघटक अनिल माळी यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे ठरविले.सिडको परिसरातील मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या माळी यांनी जागतिक चिमणी दिनी विद्यार्थ्यांना टाकाऊपासून टिकाऊ या उपक्रमात चिमणीचे घरटे बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यातून सुमारे एक हजार मुलांनी आपल्या घरातील पुठ्ठे, कागदी व लाकडी खोके, बारीक जाडीचे प्लायवूड आदींपासून आकर्षक अशी चिमण्यांची घरटी तयार केली. या उपक्रमात सुमारे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पक्षिमित्र दिगंबर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब नाशिक वेस्ट, हरित सेना, पर्यावरण मित्र, निसर्ग मित्र आदी विविध सामाजिक संस्था संघटनेचे पराग पाटोदकर, केशव पै, सीमा पछाडे, रवि वामनाचार्य, मधुकर जगताप, प्रदीप चौधरी, प्रतिभा माळी, अनिल तुपे, अपूर्वा जाखडी आदी अनेक कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत. या माध्यमातून रोटरी क्लब नाशिक वेस्ट या संस्थेच्या सहकार्याने मागील वर्षी हजारो घरटी बनविण्यात आली होती.सध्या तप्त उन्हाने साऱ्याच जीवांची काहिली होत आहे. चारा-पाण्याअभावी पशुपक्ष्यांची तडफड सुरू आहे. अशावेळी माणुसकीच्या भावनेतून घराच्या बाल्कनीत जागा असेल तिथे पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे व धान्याचे दाणे ठेवून त्यांची तहान व भूक भागवूया !अनेक मुलांना आपल्या घराच्या परिसरात ही घरटी लावली असून, मुले त्यात धान्य टाकतात. महाराष्ट्र राज्य वनविभागाच्या राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब हा उपक्रम अनेक शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. शहरातील सुमारे २५० शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.पक्षी वाचवा, पर्यावरण वाचवा या उपक्रमात शालेय विद्यार्थी अत्यंत स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात. काही घरटी ही त्र्यंबक नजीकच्या जंगलात खोरीपाडा भागात लावण्यात आली आहेत. यातील निम्म्या घरट्यांमध्ये पक्ष्यांचा वावर असून, त्यांनी तेथे अंडीदेखील घातली आहेत. तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.- अनिल माळी, संघटक, पक्षिमित्र संघटना
मुलांच्या सहकार्याने चिमणी संवर्धनाचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:52 AM