नाशिक : कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्वच कलाकारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यातील काहींचे संसार तर केवळ रंगभूमीच्या कामावरच अवलंबून होते. मात्र, हाती काम नसल्यामुळे प्रपंच कसा सांभाळायचा, असा प्रश्न पडलेले अनेक रंगकर्मी होते. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीची जाण ठेवून नाशिकमधील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कलाकारांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सभागृह कालिदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात एकूण ५० कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले. या समारंभात प्रास्ताविकात बोलताना सुनील ढगे यांनी कलावंतांनी संयम ठेवला असून, लवकरच सर्व काही सुरळीत होऊन पुन्हा कलावंतांचे सर्वकाही सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रमुख अतिथी आबा पाटकर यांनी कलाकारांना मदत करण्यामागचा हेतू स्पष्ट करीत दानशूरांनी स्वतः पुढे येऊन कलाकारांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी कलावंतांनी खचून न जाता आतापर्यंत जे धैर्य दाखवले, त्याचे कौतुक करून सर्वांनी कोरोना महामारीच्या नियमांचे पालन करून काळजी घ्यावी, तसेच आपल्या कलेद्वारे पुन्हा एकदा नव्याने उभारी घ्यावी, असे आवाहन केले. नाशिक जिल्ह्यातील गरजू कलाकारांना मेघराज राजे भोसले मित्र परिवार, नाशिक यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आबा पाटकर, शिल्पी अवस्थी, शीतल गायकवाड, अर्चना अहिरराव, नितीन देवरे, कोळप्पा धोतरे, शरदकुमार श्रीवास्तव, संतोष जाधव, प्रशांत कोठवदे, अजित पाटील, अशोक सावंत, मनोज माळी, विजय शिंगणे, अजय बोरसे, गणपत लभडे, गणेश सांगळे यांनी आपले योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि बराथे यांनी केले, उपक्रमासाठी नंदन खरे, रफिक सय्यद, रवि साळवे, उमेश गायकवाड, सुनील परमार, राजेश जाधव व अमित कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी कलावंत व तंत्रज्ञ उपस्थित होते.
फोटो
२१रंगकर्मी मदत