नाशिक : पालखेड धरणातून येवला व मनमाडसाठी आवर्तन सोडण्याच्या तयारीचा भाग म्हणून पाटबंधारे खात्याने आजपासून डाव्या कालव्यातील डोंगळे काढण्यास सुरुवात केली असून, पहिल्याच दिवशी शंभराहून अधिक डोंगळे जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात पाटबंधारे खात्याला यश आले आहे. येवला शहर, येवला तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजना, प्रासंगिक गावे, मनमाड शहर व मनमाड रेल्वे आदिंसाठी पालखेड धरणातून येत्या २५ मे पासून ७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असून, नदी व कालव्याच्या माध्यमातून विसर्ग केल्या जाणाऱ्या या पाण्याची वाटेत चोरी होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना पाटबंधारे खात्याला दिल्या आहेत. कालव्यात शेतकऱ्यांनी यापूर्वीच डोंगळे टाकून ठेवले आहेत. गेल्या वर्षी याच डोंगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी झाल्याने पाटबंधारे खाते तसेच जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली होती. सुमारे साडेसात हजारांहून अधिक डोंगळे काढण्याची मोहीम हाती घेण्याबरोबरच कालव्याच्या पाण्यावर सशस्त्र पोलीस पहारा तैनात करावा लागला होता. गत अनुभव लक्षात घेता यंदा पाणी सोडण्यापूर्वीच डोंगळे काढण्यात येत असून, शुक्रवारी पिंपळगाव ते विंचूर दरम्यान मोहीम राबविण्यात येऊन जवळपास शंभराहून अधिक डोंगळे जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले. येत्या तीन दिवस ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. पालखेड धरणातून सोडण्यात येणारे पाणी पाटोदा साठवण तलाव तसेच येवला शहरात साठवण्यात येणार असून, चालू हंगामातील हे अखेरचे आवर्तन असून, सदरचे पाणी १५ जूनपर्यंत वापरणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)
जेसीबीच्या साहाय्याने डोंगळे उद््ध्वस्त
By admin | Published: April 22, 2017 12:30 AM