भोजापूर धरणातील पाण्यावर कणकोरीसह पाच गाव व मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. धरणात आज केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्यातून कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना सुरु आहे. तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेला गटविकास अधिकारी लता गायकवाड यांच्यासह पाच गावांतील सरपंच व ग्रामसेवकांनी भेट दिली असता, योजनेच्या व्हॉल्व्हमधूनच पाणीचोरी होत असल्याचे लक्षात आले. संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांनी केल्या आहेत. कणकोरी, मानोरी, नांदूरशिंगोटे, म-हळ बुद्रुक व खुर्द या पाच गावांसाठी पाणीपुरवठा योजना भोजापूर धरणातून राबविण्यात आली आहे. मात्र, कित्येक दिवसांपासून योजनेची पाइपलाइन लिकेज असल्याने म-हळ खुर्द व बुद्रुक या दोन गावांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. गटविकास अधिका-यांनी बुधवारी योजनेच्या गळतीची पाहणी केली असता, १५ ते २० ठिकाणी पाणीगळती सुरू होती. त्या गळतीतून अप्रत्यक्षपणे जवळपासच्या शेतक-यांना फायदा होत होता. चास ग्रामपंचायतीच्या हद्दीत दोन ठिकाणी, नांदूरशिंगोटे हद्दीत व्हॉल्व्हजवळच मुद्दामहून लिकेज करून थेट पाइपलाइनद्वारेच पाणी विहिरीत सोडल्याचा प्रकार उघडकीस आला. मानोरी व कणकोरी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी चोरी उघडकीस आली. काहींनी थेट व्हॉलव्हलाच पाइपलाइन जोडून विहिरीत पाणी सोडण्यात आले आहे. कणकोरी, मानोरी, नांदूरशिंगोटे या तीन गावांच्या पाणी चोरीमुळे म-हळ खुर्द व बुद्रुक या दोन गावाचा योजनेत समावेश असूनही पाण्यापासून वंचित राहावे लागते. यापुढे पाणी चोरी होणार नाही याबाबत पाणी पुरवठा समिती व संबधीत ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी चोरी उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 5:39 PM