साईनगर येथे अंगणात खेळताना मोहित घनश्याम जाधव या सातवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळालेल्या माहितीवरून आडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मुलाचा मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात न घेता जिल्हा रुग्णालयात दाखल करणारी आई संशयित सुलोचना साेमनाथ कुऱ्हाडे व संशयित आरोपी तिचा पती सोमनाथ ऊर्फ योगेश वसंत कुऱ्हाडे (२२,रा. साईनगर, नांदूर नाका) हे दोघेही फरार झाले होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी गुन्हेशोध पथकाला तातडीने याबाबत तपास करत मयत मुलाच्या संशयित माता-पित्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. यानुसार उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे, दिलीप शिंदे, दशरथ पागी, सुनील गांगुर्डे आदींनी तपासाला गती देत घटनास्थळी पाहणी करून पुरावे गोळा केले. घरात मिळालेल्या काही सुगाव्यांवरून पथकाने कोपरगाव येथून संशयित आई सुलोचना हिला बेड्या ठोकल्या. तसेच गुन्ह्यात सहभागी असलेला तिचा पती संशयित सोमनाथ यास पेठरोडवरील एका वसाहतीतून अटक केली. या दोघांना पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अनैतिक संबंधात मुलाचा अडसर निर्माण होऊ लागल्याने त्याचे भिंतीवर डोके आपटून ठार मारल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना रविवारी (दि.२) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
---इन्फो--
माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य
नऊ महिने आपल्या गर्भात वाढविणाऱ्या बाळाला जन्म देत तब्बल सात वर्षे सांभाळ करणारी आईच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. पहिल्या पतीपासून वेगळे झाल्यानंतर प्रियकरासोबत राहत असताना अनैतिक संबंधामध्ये पोटच्या मुलाची बाधा होऊ लागल्याचे समजून प्रियकराच्या मदतीने चिमुकल्याचे भिंतीवर डोके आपटून ठार मारत माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केल्याने संताप व्यक्त होत आहे.