नाशिक : आरोग्य विभागाने सिंहस्थ नियोजनाचा भाग म्हणून शासकीय रुग्णालयांव्यतिरिक्त त्र्यंबकेश्वर येथील काही खासगी आरोग्य संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात स्वामी समर्थ केंद्र, सुश्रुत हॉस्पिटल, माउली हॉस्पिटल (त्र्यंबकेश्वर), तसेच विवेकानंद आरोग्य केंद्र, अंजनेरी आदि खासगी आरोग्य संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने त्यासंदर्भात नियोजन केले असून, या खासगी आरोग्य संस्थांची मदत घेण्यामुळे आरोग्यसुविधांमध्ये विशेष मदत होणार आहे. त्यात स्वामी समर्थ केंद्रात जवळपास १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तसेच सुश्रुत हॉस्पिटलमध्ये आठ खाटांचे आणि माउली हॉस्पिटल या रुग्णालयात अतिरिक्त दहा खाटांची व्यवस्था सिंहस्थाच्या कार्यकाळात करण्यात येणार आहे. तसेच अंजनेरी येथे पाच खाटांची व्यवस्था करण्यात येणार असून, जे भाविक अंजनेरी येथे दर्शनासाठी येतील त्यांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. खासगी आरोग्य संस्थांची मदत घेऊन तेथे आरोग्यविषयक शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
खासगी आरोग्य संस्थांचीही घेणार मदत
By admin | Published: September 12, 2014 12:45 AM