वावी : भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील लाखो नाथभक्तांनी कळस-काठी भेट घडविण्यासाठी व संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी रंगपंचमीच्या दिवशी गडावर एकच गर्दी केली होती. नाशिक जिल्ह्यातील हजारों नाथभक्तांनी श्रीक्षेत्र मढी येथे जाऊन कानिफनाथांच्या चरणी माथा टेकवला. सिन्नर तालुक्यातील वावी येथून पदयात्रेत सहभागी झालेले सुमारे सातशे नाथभक्त मनोभावे नाथांच्या चरणी लीन झाले. नाशिकसह इगतपुरी, सिन्नर, येवला, निफाड, नांदगाव आदिंसह जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून लाखो नाथभक्त यात्रोत्सवात सहभागी झाले होते. सिन्नर तालुक्यातील वावी येथून दरवर्षी पायी दिंडी जात असते. यावर्षी या पदयात्रेत सुमारे सातशे नाथभक्त सहभागी झाले होते. चार दिवसांच्या पायी प्रवासानंतर वावीकरांनी मढी गाठली. रंगपंचमीच्या यात्रोत्सवासाठी वावी येथून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती. यात्रोत्सावात वावीच्या काठीला विशेष मान असतो. श्रीक्षेत्र मढी येथे पदयात्रेत सहभागी झालेला रथ पोहोचल्यानंतर भाविकांनी मनोभावे काठी मिरवणूक काढली. काठीची मनोभावे कळसभेट घडविल्यानंतर भाविकांनी रथाजवळ येऊन महाआरती केली. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळनंतर भाविक वावीकडे परतले. दरवर्षी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच आहे. मढी येथील गाढवांचा बाजार राज्यभर प्रसिद्ध आहे. होळी पौर्णिमा ते गुढीपाडव्यापर्यंत यात्रोत्सव सुरू असतो. रंगपंचमी व गुढीपाडवा या दोन दिवसांना विशेष महत्त्व आहे. या दोन्ही दिवशी राज्यभरातून लाखो भाविक श्रीक्षेत्र मढी येथे जाऊन नाथांच्या चरणी लीन होतात. (वार्ताहर)
वावी ते मढी पदयात्रा उत्साहात
By admin | Published: March 19, 2017 10:55 PM