नाशिक : आॅगस्ट महिन्यात पावसामुळे जुना वाडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत मरण पावलेल्या दोघा तरुणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी चार लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, या घटनेत जखमी झालेल्या तिघांनाही प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार आहेत.दि. ५ आॅगस्ट रोजी जुन्या नाशकातील तांबटअळी येथील काळे वाड्याची मागील भिंत कोसळल्याने त्याखाली दबून समर्थ संजय काळे व करण राजेश घोडके हे दोघेही तरुण जागीच ठार झाले होते, तर संजय शांताराम काळे, काजल संजय काळे, चेतन पवार असे तिघे जण जखमी झाले होते. भर पावसात घडलेल्या या दुर्घटनेमुळे जुन्या नाशकातील जुन्या वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.घटनेनंतर पोलीस, अग्निशामक दलाने तातडीने धाव घेऊन बचाव व मदत कार्य उभे केले, तर घटनेचे वृत्त कळताच पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही धाव घेऊन दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा केली होती; परंतु मदत कशी करायची, असा मोठा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा ठाकला होता.जिल्हा प्रशासनाला पत्र प्राप्तवाडा जुना असल्यामुळे त्याला नैसर्गिक आपत्तीत मदत करता येणे अशक्य असल्याने कायदेशीर मुद्दा उपस्थित झाल्याने या संदर्भात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. तीन महिन्यांनंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये व जखमींना एक लाख रुपये देण्यात येत असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
वाडा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 1:30 AM