देवळा : खालप येथील दिवंगत वीर जवान विजय निकम यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एक लाख रु पयांची तातडीची मदत जाहीर केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी सायंकाळी खालप येथे स्व. विजय निकम यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर त्यांच्या समवेत होते. यावेळी महाजन यांनी निकम कुटुंबीयांची सर्व माहिती घेतली. स्व. निकम यांची मुले ओंकार, सत्यम, पत्नी श्रीमती अर्चना, बंधू संजय यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी महाजन यांनी एक लाख रु पये तातडीची मदत देण्याचे जाहीर केले. तसेच शासनस्तरावरून सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य पंकज निकम, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, सुनील देवरे, सरपंच नानाजी सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष अतुल पवार, विजय अहेर, सुभेदार गोकुळ मतकर, हवालदार डी.जी. पांगरे आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.