नांदगाव : महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भेटी सुरू झाल्या असून पाहणी झाली त्यानंतर पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. विस्थापितांच्या पुनर्वसनावर फोकस करणेसुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. आमदार सुहास कांदे यांनी आगामी काळात महापुराचा किमान परिणाम व्हावा यासाठी नद्यांच्या खोलीकरण व रुंदीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. तसेच विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी यांचेशी बोलून तोही विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.हे बरोबर असले तरी हातावर रोजीरोटी असलेल्या लोकांना कसे उभे करता येईल. याचा ही विचार व्हायला हवा. ते अतिक्रमणात आहेत, नदीमध्ये राहतात हे सगळे खरे असले तरी त्यांचे उत्पन्न व व्यवसाय अतिशय मर्यादित आहेत. त्यांचे मोठे शो रूम नाहीत किवा इतका पैसा ही नाही की त्यातून ते पुढचा मार्ग व्यवस्थित काढू शकतील. अनेकांच्या रोजच्या कमाईवर घरात चूल पेटते अशी उदाहरणे आहेत. शिवाय पुरात सगळेच वाहून गेलेल्यांची संख्या फार मोठी नाही. याक्षणी त्यांना माणुसकीचा हात हवा आहे. फोटो सेशन करून नेते मंडळी निघून ही जातील. पण अडलेल्यांना हवी आहे. थोडीशी आर्थिक मदत तिच्यातून त्यांचा पलटी झालेला व्यवसायाचा गाडा उभा राहण्यास हातभार लागू शकेल, असा दिलासा त्यांना द्यायला हवा.
‘त्यांना’ हवाय मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:20 AM