सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी मंदिर बंद असल्यामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील अर्थव्यवस्था देवी मंदिरावर अवलंबून असून, येथील ग्रामस्थांची व व्यावसायिकांचे अर्थचक्र ठप्प झाल्याने हातावर पोट असलेल्यांची व व्यावसायिकांची चिंता वाढत असताना ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे ग्रामस्थांच्या मदतीसाठी अनेक मदतीचे हात सरसावले आहेत.
राज्यात पुन्हा १ ते १५ जूनपर्यंत लाॅकडाऊन वाढविल्याचे शासनाने स्पष्ट केल्याने धार्मिक स्थळे अजून किती दिवस बंद ठेवणार, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे. गडावरील ग्रामस्थ ६५ टक्के आदिवासी बांधव व २० टक्के हातावर काम करणारे व उर्वरित व्यावसायिक असून, गत वर्षापासून व यावर्षीही कोरोनाचा सामना करत धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे येथील अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झाले आहे.
सप्तशृंगगडावरील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर कदम, दीपक जोरवर, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांच्या पुढाकाराने गजानन महाराज शेगाव, गोरेगाव प. मुंबई मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डाॅ. स्वरूप प्रामाणिक, भाग्यश्री प्रामाणिक यांच्यातर्फे येथील गरजू आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात म्हणून तांदूळ, तूरडाळ, चहा पावडर, साखर, गव्हाचे पीठ आदी जीवनोपयोगी वस्तू, किराणा साहित्याचे जम्बो ३०० किटचे वाटप करण्यात आले.
----------------------
महिनाभर पुरेल इतका किराणा वाटप
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांचे वडील नामदेवराव सूर्यवंशी, नाना सूर्यवंशी यांच्या मदतीने मी कल्याणकर सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने नितीन निकम यांच्यामार्फत येथील गरजू लोकांसाठी ५०० किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मराठा उद्योजक संघटनेतर्फे अशोक चव्हाण व अजय दुबे यांच्यातर्फे येथील ग्रामस्थांना सकाळी दररोज भोजन व्यवस्था केली आहे. सर्व गावात भाजीपाला व गहू, तांदुळाचे वाटप करण्यात आले. येथील कुटुंबांना एक ते दीड महिना पुरेल इतका किराणा माल वाटप करण्यात आला.
------------------
सप्तशृंगगडावरील ग्रामस्थांना किराणा साहित्याचे वाटप करताना ट्रस्टचे विश्वस्त डाॅ. स्वरूप प्रामाणिक, भाग्यश्री प्रामाणिक, दीपक जोरवर, ईश्वर कदम, गिरीश गवळी आदी. (३१ गड)
===Photopath===
310521\31nsk_13_31052021_13.jpg
===Caption===
३१ गड