सिन्नर : महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे जन जीवन विस्कळीत झाले आहे. त्याच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सिन्नर येथील शिव सरस्वती फाउंडेशनने मदतीचा हात पुढे करत सिन्नर शहरात मदत फेरीचे आयोजन केले होते. या मदत फेरीद्वारे सिन्नरवासियांना पुरग्रस्तांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचे आवाहन शिव सरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमंतिनी कोकाटे यांच्या वतीने करण्यात आले होते, त्याला सिन्नरकारांकडून उस्त्फुर्त प्रतिसाथ मिळाली.महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुराच्या परिस्थिती मुळे भयंकर संकट राज्यावर कोसळलेले आहे. या संकटाशी तोंड देण्याचा प्रशासन व सरकार पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र आलेल्या संकटाचे स्वरूप बघता प्रशासन देखील हतबल झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक कलाकार, उद्योजक, सेवाभावी संस्था पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाताना दिसत आहेत. सिन्नर येथील शिव सरस्वती फाउंडेशनतर्फे ही मदत फेरी काढून सामाजिक बांधिलकी जपत ‘एक हात मदतीचा, एक वाटा खारीचा’ नारा देत भाविनक साद सिन्नरकरांना घातली आहे. केरळ राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना देखील संस्थेमार्फत अशीच फेरी काढून मदत जमा करून प्रशासनाच्या हवाली सुफुर्द केली होती. यावेळी देखील गहू, तांदूळ, कोलगेट, साबण, तेल, औषधे आदी यासारख्या वस्तू मोठ्या प्रमाणात फेरीत जमा झाल्या आहेत. कोकाटे यांनी केलेल्या आवाहानाला ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या स्वरूपातील मदत गाड्यांमध्ये भरून गावागावातून माणिकराव कोकाटे यांच्या कार्यालयावर जमा होत आहे. ११, १२ आणि १३ आॅगस्टपर्यंत सिन्नरच्या उपनगरातील नागरिकांनी मदत जमा करण्यासाठी व्ही राजे ग्रुपच्या कार्यालायावर व्यवस्था करण्यात आली आहे तर ग्रामीण भागातील येणारी मदत ही माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयावर जमा करण्यात येणार आहे.
सिन्नरला पुरग्रस्थांच्या मदतीसाठी मदतफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 6:46 PM