पंचवटी : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस पक्षाची शहर व जिल्हा आढावा बैठक मुंबई नाका येथील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन पक्षाचे ध्येय-धोरणे ठरविण्यात आले. शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यभरात आंदोलन छेडले जाणार आहे. याशिवाय पक्षाकडून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत करणे, लोकसेवा व राज्यसेवा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पक्षाकडून अभ्यास मार्गदर्शन शिबिर राबविणे, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील अनेक विद्यार्थी नाशिक शहरात शिक्षण घेत असून, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि ज्या विद्यार्थ्यांना २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती मिळालेली नाही ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कोते पाटील यांनी सांगितले. विद्यार्थीचे शहराध्यक्ष गौरव गोवर्धने यांनी पक्षाचे ध्येय धोरणे लक्षात घेऊन पक्ष बळकटीसाठी विद्यार्थ्यांना एकत्र आणणे, तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी समजावून त्या पक्षाच्या माध्यमातून सोडविणे यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, विष्णूपंत म्हैसधुणे, सचिन पिंगळे, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, प्रेरणा बलकवडे, तानाजी गायधनी, दीपक वाघ आदिंसह राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत करणार
By admin | Published: October 26, 2015 11:20 PM