काँग्रेसच्या गटनेतेपदी हेमलता पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:51 AM2019-02-23T00:51:22+5:302019-02-23T00:51:39+5:30
मनपातील कॉँग्रेस पक्षाच्या गटनेतापदी शाहू खैरे यांना हटविण्यात आले असून, त्यांच्या जागी डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात, पाटील यांच्या नियुक्तीचे पत्र महासभेत वाचण्यास महापौरांनी टाळले त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक : मनपातील कॉँग्रेस पक्षाच्या गटनेतापदी शाहू खैरे यांना हटविण्यात आले असून, त्यांच्या जागी डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात, पाटील यांच्या नियुक्तीचे पत्र महासभेत वाचण्यास महापौरांनी टाळले त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मनपातील काँग्रेस पक्षाच्या गटनेत्यांसह सर्वच पदाधिकारी बदलावे, अशी मागणी मध्यंतरी नाशिक दौऱ्यावर आलेले प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेसच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर पक्षाने अधिकृत निर्णय घेतला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी गेल्या बुधवारी (दि.२०) डॉ. हेमलता पाटील यांना पत्र दिले आहे. पाटील या कॉँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नगरसेवक असून, प्रदेश कॉँग्रेसच्या प्रवक्ता आहेत. तसेच उत्तर महाराष्टÑाच्या समन्वयकपदी त्यांची अलीकडेच नियुक्ती झाली आहे.
दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनी कॉँग्रेस गटनेता हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, परंतु गोंधळामुळे पत्राचे वाचन करता आले नसल्याचे सांगितले. डॉ. हेमलता पाटील यांची गटनेता पदावर वर्णी लागल्याने नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीवरदेखील त्यांची गटनेता म्हणून संचालक नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बुधवारी (दि.२०) महासभेत याबाबत घोषणा होणे अपेक्षित होते, परंतु त्या सभेत गोंधळ झाला होता. त्याचप्रमाणे शुक्रवारी (दि.२०) महासभेत घोषणा होणे अपेक्षित होते, परंतु महापौरांनी अभिनंदनाचे प्रस्तावातदेखील तो घेतला नसल्याने कॉँग्रेसच्या गटनेता बदलण्यास भाजपाचा विरोध आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.