नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या अहमदनगर, पुणे व नाशिक जिल्ह्यातील सर्व ९३५ महाविद्यालयांमधील सुमारे साडेतीन लाख विद्यार्थिनींची विद्यापीठाकडून मोफत हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या आरोग्य प्रबोधन कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये दिसणाऱ्या आरोग्याच्या समस्या, आहारातील महत्त्वाच्या घटकांची कमतरता, मासिक पाळीदरम्यानच्या तक्रारी, समज व गैरसमज तसेच मानसिक व भावनिक समस्या या सर्वांचा विचार करून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची आज सुरूवात करण्यात आली.विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांमध्ये टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, ज्या विद्यार्थिनींचे हिमोग्लोबीन नऊपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना विद्यापीठाकडून मोफत गोळ्या देण्यात येतील. त्याचबरोबर तपासणी केलेल्या प्रत्येक विद्यार्थिनीला प्रमाणपत्रदेखील देण्यात येईल. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यापीठाला ई-मेलद्वारे त्वरित कळवावे, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, सदर उपक्रमाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीनेच हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, वित्त व लेखा अधिकारी विद्या गारगोटे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)