नाशिक : ऐतिहासिक-पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये विविध प्राचीन स्मारके आढळून येतात. शहरातील हा दुर्मीळ ठेवा जपला जावा, त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी शहराची वारसा जतन समिती अस्तित्वात येणे गरजेचे आहे. मात्र महापालिका व जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे अद्याप लक्ष पुरविले नसल्याने ‘वारसा’ रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.वारसा जतन व संवर्धनाची जबाबदारी शासनाने राज्य व केंद्र पुरातत्त्व विभागाकडे सोपविली असली तरी नव्या वारसा स्थळांचा शोध घेणे, त्याचे महत्त्व पटविणे आणि पुरातत्त्व विभागाचे त्याकडे लक्ष वेधून संवर्धनासाठी प्रयत्नशील राहून एक दुवा म्हणून कार्य करण्यासाठी शहर व जिल्ह्याची वारसा समिती असणे गरजेचे आहे. वारसा स्थळाचा विकास आणि संवर्धन काळाची गरज आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वारसा समिती गठित के ली जावी.‘वारसा’ दृष्टिक्षेपात असानाशिकचा वारसा सुरू होतो तो लेणीपासून. त्रिरश्मी/बौद्ध लेणी (पांडवलेणी). म्हसरूळ येथील चामरलेणी, त्रिंगलवाडीमधील जैन लेणी, अंजनेरी गडावरील लेणीचा समावेश आहे. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील डोंगरी, भुईकोट प्रकारातील तब्बल ६५ ते ६७ गड-किल्ले, पौराणिक मंदिरे, मशिदी अशा विविध प्राचीन स्मारकांचा ठेवा या शहराला लाभला आहे.वारसा जतन समितीबाबत २००७ सालानंतर सर्व हालचाली थंडावल्या. त्यावेळी केलेले सर्वेक्षण व अहवालात नोंदविलेली निरीक्षणे धूळखात पडली. कालौघात जुन्या गावठाणांमधील बहुतांश वाडे नामशेष झाले. पालिकेकडे सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. समिती लवकरात लवकर स्थापन केली जावी, यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे.- शैलेश देवी, वास्तुविशारद
वारसा जतन समिती वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 1:01 AM