------
अझहर शेख, नाशिक : जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा बजावत असताना सैनिकांच्या ‘बंकर’मध्ये अचानक लागलेल्या आगीत बागलाण तालुक्याचा भूमिपुत्र स्वप्निल रौंदळ (२२) यास वीरमरण आले. आपले शहीद काका बाजीराव धर्मा रौंदळ यांचा त्याग, शौर्य आणि बलिदानातून प्रेरणा घेत भारतीय सैन्यात जाण्याचा मार्ग निवडला होता. आपल्या काकांचा वारसा स्वप्निल यशस्वीपणे पुढे चालवित असताना काळाने त्याच्यावर झडप घातली.
---
१५ सप्टेंबर १९८३ चाली जम्मू-काश्मीरच्या नरबल गावामध्ये एका शेतात हिजबुल मुजाहिदीनचे काही अतिरेकी लपल्याची गुप्त माहिती भारतीय सैन्याच्या ऑपरेशन रक्षक पथकाला मिळाली होती. यावेळी या ऑपरेशन रक्षक पथकातील बागलानचे भूमिपुत्र बाजीराव रौंदळ यांनी एका अतिरेक्याला पथकावर हल्ला करण्यापूर्वी मक्याच्या शेतात आपल्या बंदुकीने टिपले; मात्र ते जखमी झाल्याने त्यांनी जवळच्या एका घरात आश्रय घेतला. यावेळी मोठ्या धाडसाने बाजीराव यांनी अतिरिक्त कुमक येईपर्यंत ज्या घरात अतिरेकी लपलेला होता त्या घरावर आपल्या रायफलने गोळीबार सुरूच ठेवला त्यामुळे अतिरेक्यांना घरातून निसटता आले नाही. या दरम्यान अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात बाजीरावदेखील जखमी झाले होते. तरीदेखील त्यांनी अतिरेक्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आपला गोळीबार सुरूच ठेवला होता.
त्यांना ‘हिजबुल मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर असलेल्या एका अतिरेक्याला ठार मारण्यास यशही आले होते; मात्र काही गोळ्या त्यांच्या छातीवर आणि डोक्याला लागल्याने बाजीराव यांना वीरमरण आले. त्यांच्या या शौर्यामुळे सैन्याला या घरातून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यास यश आले होते.
बाजीराव यांना मरणोत्तर ‘शौर्य चक्र’ने सन्मानित करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते वीरपत्नी कल्पना रौंदळ यांनी १९९४ साली हा पुरस्कार स्वीकारला होता. त्यावेळी स्वप्निल हा अवघ्या पाच ते सहा वर्षांचा होता. त्याचे मोठे काका रघुनाथ रौंदळ हेदेखील भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. एकूणच या कुटुंबाने भारतीय सैन्यात आपले मोठे योगदान दिले आहे. आपल्या दोन्ही काकांच्या देशसेवेचा सैनिकी वारसा स्वप्निल पुढे चालवित होता. त्यांच्या प्रेरणेने त्यानेही भारतीय सैन्यात चार वर्षांपूर्वी प्रवेश केला होता.
-----
-
काका-पुतण्याचे फोटो nsk वर सेंड केले आहेत.