नाशिक : नाशिक तालुक्यातील लहवितचे भुमीपूत्र व तोफखाना केंद्राच्या २८५मिडियम रेजिमेंटचे लान्सनायक संतोष विश्वनाथ गायकवाड यांना सिक्कीमच्या उत्तरेला आसामच्या ‘लंका’ नावाच्या लोकेशनवर कर्तव्य बजावताना वीरमरण आले. अधिकृत माहिती सिक्कीम आर्टीलरी मिडियम रेजिमेंटकडून नाशिकरोड तोफखाना केंद्राला कळविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यांच्या मुळ गावी लष्करी इतमामात बुधवारी (दि.२६) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गायकवाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सिक्कीमच्या उत्तरेला आसाम राज्यातील होजाई जिल्ह्यातील लंका शहराजवळ बर्फाळ प्रदेशात संतोष गायकवाड हे कर्तव्यावर तैनात होते. रक्त गोठविणाऱ्या थंडीमुळे त्यांना अचानकपणे मेंदूमध्ये त्रास उद्भवला. रेजिमेंटकडून तत्काळ त्यांना कोलकात्याच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. उणे १५ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान या भागात असते. तेथे गायकवाड हे कर्तव्य बजावत होते. ते आर्टीलरीच्या २८५ मिडियम रेजिमेंटमध्ये लान्सनायक पदावर होते. त्यांचे पार्थिव नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात मंगळवारी (दि.२५) रात्री बारा वाजेपर्यंत दाखल होण्याची श्यक्यता लष्कराच्या सुत्रांनी वर्तविली आहे. गायकवाड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी ही नाशिकरोडच्या तोफखाना केंद्राच्या ६२१-साठा बॅटरीकडे सोपविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
ऐन दिवाळीत शोककळा!
लहवितच्या शेतकरी कुटुंबातून गायकवाड हे भारतीय सैन्यदलात तोफखान्याच्या माध्यमातून दाखल झाले होते. ऐन दिवाळीत त्यांना वीरमरण आल्याने गायकवाड कुटुंबिय शोकमग्न झाले आहे. लक्ष्मीपुजन व भाऊबीजेचा उत्साह असताना ही दु:खद घटना घडल्याने सणाचा आनंद शोकात बदलला आहे. लहवित पंचक्रोशीत गायकवाड यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपुर्वीच झाली होती शस्त्रक्रिया
रक्त गोठविणाऱ्या थंडीमुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाल्यानंतर गायकवाड यांना तातडीने कोलकात्याच्या सैन्याच्या कमान्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दोन दिवसांपुर्वीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती; मात्र दुर्दैवाने मंगळवारी पहाटे तीन वाजून ५० मिनिटांनी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याचे माजी सैनिक व त्यांचे आतेभाऊ विजय जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.