अझहर शेख
नाशिक : भारतीय सेनेच्या बिहार रेजिमेंटच्या ७व्या बटालियनचे मेजर प्रसाद महाडिक हे कर्तव्य बजावताना शहीद झाले होते. त्यांच्या शाैर्यापासून प्रेरणा घेत वीरपत्नी गौरी महाडिक यांनीही भारतीय सैन्यदलात जाण्याचा निश्चय करत तो पूर्ण केला.
कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये त्यांनी बेसिक रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीमचे यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना गुरुवारी दीक्षांत सोहळ्यात ‘आरपीएएएस विंग’ प्रदान करून गौरविण्यात आले. भारत-चीन सीमेवरील ‘आसाम हिल’ येथे टॅन्क तपासणी करताना झालेल्या स्फोटात मेजर प्रसाद महाडिक यांना वीरमरण आले होते. यानंतर वीरपत्नी गौरी महाडिक यांनी सैन्यात भरती होऊन शहीद पतीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यांनी चेन्नईच्या अकादमीत प्रशिक्षण घेतले, जेथे त्यांच्या पतीने प्रसाद महाडिक यांनी प्रशिक्षण घेतले होते.
स्वप्न पूर्ण झाले n कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये (कॅट्स) मागील वर्षभरापासून महाडिक यांनी आधुनिक रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम प्रणालीअंतर्गत उड्डाणाचे धडे घेतले. n त्या सध्या कॅप्टन पदावर असून त्यांना गुरुवारी समारंभपूर्वक विंग्स प्रदान करून गौरविण्यात आले. सैन्याचा गणवेश धारण करून पतीला श्रद्धांजली अर्पण करण्याचे त्यांनी बघितलेले स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांना गहिवरून आले होते. n ड्रोन तसेच मानवविरहित लहान एअरक्राफ्टद्वारे सीमेवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. कॅट्समधून प्रथमच मागील वर्षभरापासून या ‘आरपीएएस’ प्रणालीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. n यावर्षी हा अभ्यासक्रम १८ अधिकाऱ्यांनी पूर्ण केला. यामध्ये कॅफ्टन गौरी महाडिक यांच्यासह अन्य दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
मार्च २०२० साली त्या लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाल्या. आता त्यांनी पायलट होण्यासाठीचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.