नाशिक : गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या शहराला पुराचा धोका नव्हता असेनाही, परंतु गेल्या काही वर्षात गोदावरी अन्य तीन नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात बांधकामे करून नदीपात्र संकुचित करण्यात आले आहेत. २००८नंतर हा प्रश्न प्रामुख्याने आढळला असला तरी बांधकामांवर कारवाई मात्र झालेली नाही. इतकेच नव्हे तर सुधारित पूररेषेत महापालिकेने केलेली बांधकामे जैसे थे आहेत. गोदावरी, नासर्डी, वाघाडी आणि वालदेवी या तीन प्रमुख नद्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नदीपात्राचा अतिक्रमणांमुळे संकोच होत असतानादेखील पाटबंधारे खात्याचा ना हरकत दाखला मिळाला म्हणून नदीकाठावर सर्रास बांधकामे करण्यास परवानग्या देण्यात आल्या. २००८ मध्ये शहरातील सर्वच नद्यांना महापूर आल्यानंतर नदीपात्रालगत बांधकामे झालीच कशी याचाशोध घेताना अनेक बाबी उघड झाल्या होत्या. १९९३-९५ दरम्यान, महापालिकेचा पहिला शहर विकास आराखडा मंजूर करण्यात आला. त्यावेळी सुरुवातीला प्रारूप आराखड्यात गोदावरी नदीलगत असलेली बफर्स झोनची रेषा अंतिम आराखड्यात गायब झाल्याचे आढळले होते. त्यानंतर प्रशासनाने जलसंपदा विभागाकडून पूररेषा आखून घेतली असली तरी अगोदर महापालिकेने ज्या बांधकामांना परवानग्या दिल्या ती बांधकामे आजही नदीपात्र संकुचित करीत आहेत. नदीपात्रालगतची कोणतीही पक्की बांधकामे हटली नाहीत, उलट आखलेली पूररेषा कमी करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आटापिटा सुरू आहे. जी बांधकामे झाली आहेत, त्याच्या मालकांनी न्यायालयात जाऊन हा विषय आणखी घोळात ठेवली आहेत. नदीपात्रांच्या संकोचाचा प्रश्न केवळ गोदावरी नदीपुरता मर्यादित नाहीतर नासर्डी, वाघाडी आणि वालदेवीबाबतदेखील आहेत. तेथील बांधकामेदेखील हटलेली नाहीत. गोदावरी नदीच्या प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयातील याचिकेच्या अनुषंघाने मुंबई उच्च न्यायालयाने गोदावरी नदीपात्रातील बांधकामे हटविण्याचे आदेश दिले होते. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्या अनुषंघाने काही मंगल कार्यालये आणि लॉन्स हटविली होती. नंतर मात्र, सर्व कार्यवाही बंदच आहे. नदीपात्रातील गोरगरिबांच्या झोपड्या हटविल्या जातात, परंतु अन्य निवासी मिळकती, व्यापारी संकुले व अन्य बांधकामे ‘जैसे थे’ आहेत.---------एकही बांधकाम हटविण्यात आलेले नाहीमहापालिकेची बांधकामे ‘जैसे थे’ केवळ खासगी नव्हे तर महापालिकेसह अन्य शासकीय बांधकामेदेखील नदीपात्रालगत असून, तेही नदीपात्राचा संकोच करीत आहेत. महापालिकेचा गोदापात्र, पंचवटीतील गणेशवाडी येथील भाईमंडई, गणेशवाडी येथील अभ्यासिका, अशी अनेक बांधकामे आहेत, तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने नासर्डी नदीलगत समाज कल्याण खात्याचे कार्यालये आणि वसतिगृह बांधले आहेत. त्यातील एकही बांधकाम अद्याप हटविण्यात आलेले नाही.एकीकडे पूररेषतील बांधकामे हटविण्याचे आव्हान महापालिकेला पेलता येत नाही आणि दुसरीकडे पूररेषा कमी करण्याचे घाटत आहे. काहीही उपाययोजना करून पूररेषा कमी करून नदीपात्रातील बांधकामे वाचविण्याचे प्रयत्न असून, त्यात अनेक लोकप्रतिनिधी पुढाकार घेत आहेत, हे विशेष होय.(क्रमश:)
नदीपात्राचा संकोच कायम; अतिक्रमणे ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 9:38 PM