नाशिक : थंडीत गणपती आणि अन्य देवांना स्वेटर घालण्याचे प्रकार अनेक शहरात किंवा जिल्ह्यात आढळतात. परंतु नाशिकमध्ये ‘कोरोना’पासून बचाव करण्यासाठी चक्क विघ्नहर्त्या गणरायाच्या मुखाला मास्क लावण्यात आला आहे. नाशिकच्या लाडक्या नवश्या गणपतीला हा मास्क लावण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर गणरायाचे वाहन असलेल्या मूषकाला देखील मास्क लावण्यात आला आहे.अर्थात, भाविकांची देखील मंदिर देवस्थानच्या वतीने काळजी घेण्यात येत असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर हॅण्ड सॅनिटायझर लावूनच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. नाशिक शहरात गंगापूर रोडवरील आनंदवल्ली जवळ गोदावरी नदीच्या काठावर नवश्या गणपती मंदिर आहे. नावाप्रमाणेच हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. नदीकाठी असलेले हे देवस्थान पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. दररोज शेकडो भाविकांची मंदिरात हजेरी असते. मात्र, सध्या भाविकांची संख्या रोडावली आहे. कोरोनाची भीती वाटत असल्याने भाविकांच्या संख्येवर परिणाम झाला असला तरी देवस्थान मात्र भाविकांचीच नव्हे तर विघ्नहर्त्या गणरायाची देखील काळजी घेत आहे. गणपती मूर्तीच्या मुखालाच चक्क मास्क लावण्यात आला आहे.---भाविकांनी ‘कोरोना’सारख्या संसर्गजन्य आजारापासून स्वत:चा व इतरांचा बचाव करावा, हा संदेश यामाध्यमातून दिला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावूनच जावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी बागडताना सर्रासपणे थुंकणे टाळावे. जेणेकरून शहर कोरोना आजारापासून सुरक्षित राहण्यास मदत होईल. वैयक्तिक स्वच्छतेकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे.- राजू जाधव, अध्यक्ष नवश्या गणपती मंदीर देवस्थान
अहो आश्चर्यम! नाशिकमध्ये चक्क विघ्नहर्त्या गणरायाच्या मुखालाही मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 2:37 PM
भाविकांची देखील मंदिर देवस्थानच्या वतीने काळजी घेण्यात येत असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर हॅण्ड सॅनिटायझर लावूनच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे.
ठळक मुद्देगणपती मूर्तीच्या मुखालाच चक्क मास्क गणरायाचे वाहन असलेल्या मूषकाला देखील मास्क