नाशिक : शहराला वाढीव पाणीकपातीची गरज नाही आणि ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा गंगापूर धरणसमूहात उपलब्ध असल्याचा वारंवार दावा एकीकडे पालकमंत्री करत असताना महापालिका प्रशासनाने मात्र नियमित १५ टक्के पाणीकपातीव्यतिरिक्त सुमारे १० टक्के वाढीव पाणीकपात कारभाऱ्यांना अंधारात ठेवत छुप्या पद्धतीने लागू केली असल्याचे उघडकीस आले आहे. महापौर, उपमहापौरांसह गटनेत्यांनीच आकडेवारीनिशी छुप्या पाणीकपातीचा भांडाफोड करत प्रशासनाला चिमटीत पकडले. पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी प्रायोगिक तत्त्वावर सदर पाणीकपात सुरू केल्याची कबुली दिल्यानंतर महापौरांनी सदर वाढीव पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे आणि पालकमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणेच नियमित १५ टक्के पाणीकपात सुरू ठेवण्याचे आदेशित केले. दरम्यान, प्रशासनाचा बोलविता धनी वेगळाच असल्याने पाणीकपातीवरून पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीकपातीवरून महापालिकेतील सत्ताधारी आघाडी आणि भाजपा यांच्यात संघर्ष टोकाला जाऊन पोहोचला आहे. गेल्या गुरुवारी त्र्यंबकेश्वरी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या महापूजेसाठी आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गंगापूर धरणातील आणखी ३०० दलघफू पाणी महापालिकेसाठी आरक्षित करण्याचे जाहीर केले होते. याशिवाय, वाढीव पाणीकपातीची गरज नसल्याचेही स्पष्ट केले होते. आमदार बाळासाहेब सानप यांनीही वाढीव पाणीकपात होणार नसल्याचे ठामपणे सांगितले होते. वाढीव पाणी आरक्षण मिळाल्याने आता पाणीकपात होणार नाही, असे मानले जात असतानाच गेल्या ५ फेबु्रवारीपासून शहरात नागरिकांकडून पाण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. वाढत्या तक्रारींचे प्रमाण लक्षात घेऊन उपमहापौर गुरुमित बग्गा आणि शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी त्याबाबत शोधकार्य सुरू केले असता महापालिका प्रशासनाने गेल्या चार दिवसांपासून छुपी पाणीकपात सुरूकेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मंगळवारी दुपारी उपमहापौरांसह सर्व गटनेत्यांनी महापौरांची भेट घेऊन छुप्या पाणीकपातीचे धक्कादायक वास्तव अगदी आकडेवारीनिशीच मांडले. उपलब्ध आकडेवारीनुसार, १५ टक्के पाणीकपात सुरू असताना गंगापूर आणि दारणा धरणातून प्रतिदिन १२.६० दलघफू पाणी उचलले जात होते. दि. १ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीत गंगापूर धरणातून ३५७.६८ दलघफू, तर दारणातून ३२.९७ दलघफू पाणी उचलले गेले.
छुपी पाणीकपात, कारभारी अंधारात!
By admin | Published: February 10, 2016 12:13 AM