मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडविला असून, रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढच होत आहे. कोरोनाचा अचानक स्फोट होण्यामागे नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे केलेले उल्लंघन, लग्नसमारंभ, अंत्यविधी, धार्मिक सोहळे व सण, उत्सव काळात झालेली गर्दी कारणीभूत असल्याचा निष्कर्ष आरोग्य खात्याने काढला आहे. कोरोना विषाणूंचा संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट ही त्रिसूत्री जारी करून त्या आधारे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. गुरुवारी दिवसभर राज्यभरातील ३५ जिल्ह्यांत करण्यात आलेल्या एकूण दोन लाख, ६७ हजार ७०४ कोरोना तपासणीत ५७ हजार ८५१ बाधित रुग्ण सापडले असून, चाचणीच्या तुलनेत सापडलेल्या पॉझिटिव्ह रेट २१.६ इतका आहे. या चाचण्यांमध्ये एक लाख ६६ हजार ४७३ आरटीपीसीआर तर एक लाख, एक हजार २३१ अँटिजन चाचण्यांचा समावेश आहे.
काेरोनाबाधितांच्या तुलनात्मक आढाव्यात उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक ३९.३ इतका पॉझिटिव्ह रेट आला आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व नगर या पाच जिल्ह्यात करण्यात आलेल्या २३,६४८ तपासणीत ९,२९४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्या खालोखाल कोल्हापूर सर्कलमधील कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या चार जिल्ह्यांचा पॉझिटिव्ह रेट ३१.३ इतका आला आहे. मुंबई सर्कलमधील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच ११.३ इतका पॉझिटिव्ह रेट आहे. या सर्कलमध्ये ८१,९४३ इतक्या चाचण्या घेण्यात आल्या असता, त्यापैकी ९,२५१ इतकेच बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
चौकट====
सर्कलनिहाय बाधित रुग्ण व रेट
१) पुणे सर्कल- १४,४३५ (२२.४)
२) औरंगाबाद सर्कल- २,८१६ (१९.६)
३) लातूर सर्कल- ३,४९९ (२७.२)
४) अकोला सर्कल- ४,९२६ (२५.८)
५) नागपूर सर्कल- ८८,३०८ (२४.३)