नाशिक : महाराष्टतील वातावरण व नागरिकांच्या चुकीच्या सवयीमुळे देशभरातील स्वाइन फ्लूच्या आकडेवारीचा अभ्यास करता, महाराष्टÑात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करणे गरजेचे असून रुग्णांना स्वाइन फ्लूची लक्षणे, उपचार, चाचण्या यांबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन डॉ. योगेश असावा यांनी केले. आयएमए हॉल येथे शुक्रवारी (दि.१५) आयोजित स्वाइन फ्लू कार्यशाळेत ते बोलत होते. नाशिक महानगरपालिका आरोग्य समिती आणि आयएमए यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. असावा यांनी पुढे सांगितले की, स्वाइनचा प्रारंभ झाला तेव्हापासून जगभरात चीन, आॅस्ट्रेलिया व भारतात सर्वाधिक रुग्णं आढळून आले आहेत. भारतातील आकडेवारी पाहिल्यास महाराष्टÑ याबाबतीत अग्रेसर आहे. पूर्वी पावसाळा संपतानाच्या काळातच वाढणारा स्वाइन फ्लू आता वर्षभर आढळून येत आहे. त्यामुळे त्याची लक्षणे, उपचार, चाचण्या यांची प्राधान्याने माहिती करून घेत चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यास पूर्ण उपचार करून घेणे गरजेचे आहे. याबाबतीत डॉक्टरांनी रुग्णांचे प्रबोधन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यांनी स्वाइन फ्लूबाबतची जगभरातील पहाणी, आकडेवारी, उपचारपद्धती आदींविषयी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त महेश झगडे, डॉ. योगेश असावा, डॉ. दिलीप गरुड, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, मनपाचे आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी विजय डेकाटे, डॉ. आवेश पलोड, डॉ. हेमंत सोननीस, संदर्भ रुग्णालयाचे डॉ. प्रल्हाद गुटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. सुमित्रा घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. आयुक्त झगडे यांनी पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आणि नेमका त्याच काळात स्वाइन फ्लूचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला असताना केलेल्या उपाययोजना, त्याचे अनुभव यावेळी व्यक्त केले. स्क्रीनिंग केंद्र वाढविणे, स्वाइन फ्लूबाबत जनजागृतीपर कार्यक्रम, बाधित रुग्ण ट्रिटमेंट पूर्ण करत आहेत ना याची माहिती घेण्यासाठी सुरू केलेले कॉलसेंटर, शाळा-कॉलेजांमध्ये विशेष जनाजागृती कार्यक्रम याविषयीचे आपले अनुभव सांगितले. आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी यांनी स्वाइन फ्लूचा नाशकात वाढता प्रादुर्भाव दूर होण्यासाठी डॉक्टरवर्गाने विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी केले. स्वाइन फ्लूबाबतीतले अद्ययावत ज्ञान घेण्यासाठी ही कार्यशाळा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेस मनपा डॉक्टर्स बहुसंख्येने उपस्थित होते.
महाराष्टत स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:46 AM