घोटी : इगतपुरीसारख्या आदिवासी तालुक्यात शिक्षण विभागाला विविध समस्यांचा सामना करावा लागतो खरा परंतु रडत बसण्यापेक्षा लढत राहण्यासाठी नवनिर्वाचित गटशिक्षण अधिकारी राजेश तायडे यांनी विविध पर्याय उभे करून आदिवासी भागातील अतिदुर्गम भागात शिक्षकांनी प्रत्यक्ष जाऊन वाड्या - पाड्यांवर शिक्षणाचा ज्ञान यज्ञ प्रज्वलित केला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोनाच्या महामारीत शिक्षणाची ऐसी- तैसी झालेली सगळ्यांनी बघितली. परंतु २ वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर बिघडलेली अवस्था पूर्व पदावर आणण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २२३ शाळा असून, प्रत्येक मुलापर्यंत पोहोचून ऑनलाईन - ऑफलाईनद्वारे शिक्षक ज्ञानदानास प्रारंभ झाला आहे.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून शाळा, महाविद्यालय सुरू होऊ शकले नाहीत. काहीअंशी कोविड नियमांचे पालन करून १०वी १२वीचे वर्ग चालू करण्यात आले. कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा वर्ग बंद करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, या अनुषंगाने म्हणून विविध पर्याय समोर उभे केले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय स्तरावर सर्व माध्यमे पुढे येऊन शिक्षण मोहीम पार पाडण्यासाठी इगतपुरीचे गटशिक्षण अधिकारी तायडे व संपूर्ण टीम सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत.
ऑनलाईन शिक्षण - तालुक्यात ऑनलाईन शिक्षण देण्याच्या हेतूने उपलब्ध संसाधनांचा शोध घेण्यात आला. तालुक्यात ई कंटेन्ट मुलांपर्यंत पोहोचविण्यात आले. शाळा स्तरावर वर्गनिहाय व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून सदरील ई कंटेन्ट मुलांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.
आदिवासी तालुका असल्याने बहुतांश पालकांकडे अँड्राइड मोबाईल उपलब्ध नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करून शिक्षक व इतर अधिकारी यांनी विविध दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांच्याशी हितगूज करून आदिवासी मुलांच्या शिक्षणाविषयीची आस्था समजावून सांगितली. आर्थिक स्थिती बघता मदतीचे आवाहन करण्यात आले. अनेकांनी भरभरून मदत केली. तालुक्यात अदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी एफएम रेडिओचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले.
एससीईआरटी, पुणेच्या माध्यमातून आकाशवाणीवर विविध विषयावर शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात येते. इयत्तानिहाय अभ्यासक्रमाचे पाठ घेण्यात येतात. याचा मुलांनी लाभ लाभ घेतला. टीव्ही / एलसीडी विविध शाळेतील शिक्षकांनी, सेवाभावी संस्थांची मदत घेऊन दानशूर व्यक्तींच्या मदतीने गाव, वाड्या, वस्तीवर या संचाचे वाटप करून मुलांना शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डीडी सह्याद्री वाहिनीवर ''ज्ञानगंगा'' १ली ते १२वीसाठी जिओ टीव्हीवरील १२ शैक्षणिक चॅनल, जिओ सावन ॲपवरील दृकश्राव्य कथा, कादंबऱ्या, पुस्तके, शैक्षणिक नेतृत्त्वाचा विकास, सुजाण पालक आरोग्य असे यु ट्यूबच्या माध्यमातून उद्बोधन मुले व पालकांपर्यंत पोहोचविण्यात येते.
ऑफलाईन शिक्षण : ओट्यावरची शाळा -
गाव, वाडी, वस्तीवर मुलांकडे काही प्रमाणात ई कंटेन्ट पोहोचत नसल्याने शिक्षकांनी वस्तीवर गल्लीतील तीन ते चार मुलांना ओट्यावर बोलावून अध्ययनाचे काम चालू केले आहे. ''शिक्षण आपल्या दारात'' याप्रमाणे शिक्षक गल्लीतच उपलब्ध जागेत मुलांना ज्ञानाचे धडे देत आहेत. याच मुलांमधील एखाद्या हुशार मुलाकडे जबाबदारी देऊन मुलांच्या अध्यापनात एक चैतन्य निर्माण करण्याचे कार्य चालू आहे.
गल्ली मित्र : गल्लीतील सर्वच मुलांकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याने ज्या मुलांकडे मोबाईल आहेत, अशा मुलांचा गट तयार करून अभ्यासक्रम सोडविण्यात येत आहेत. तसेच मोठ्या वयाच्या मुलांचा यात सहभाग घेऊन मुले अँड्रॉईड फोनवर विविध अभ्यासक्रम स्वाध्याय सोडविण्यात येत आहेत.
स्वाध्याय / वर्क शीट कार्ड : वर्गशिक्षक मुलांना घरपोच स्वाध्यायाच्या वर्क शिट पोहोचवून मुलांकडून कृती करून घेत आहेत.
पालक सभा व जनजागृती - शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पालक सभांचे आयोजन करून कोविडची जनजागृती करण्यात आली. प्रत्येक नागरिकाने लसीकरण करणे किती महत्त्वाचे आहे, याची जनजागृती केली जात आहे. गावात एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही तसेच शाळाबाह्य एकही मूल सापडणार नाही, यासाठी शंभर टक्के पटनोंदणी करण्यात येत आहे.
डिजिटल क्लास : आवश्यकतेनुसार शिक्षकांमार्फत मुलांना zoom, Google class Room इ. माध्यमातून मुलांचे अध्ययन, अध्यापनाचे काम चालू आहे.
दीक्षा ॲपचा जास्तीत जास्त वापर करण्याबाबत विद्यार्थी, पालकांना माहिती देण्यात येत आहे.
सेतू अभ्यासक्रम : सेतू अभ्यासक्रमाचे आयोजन १ जुलै ते १४ ऑगस्ट २०२१ दरम्यान करण्यात येत आहे. यासाठी व तीन चाचण्या घेऊन मुलांच्या क्षमता लक्षात घेऊन मुल शिकत असलेल्या इयत्तेचा अभ्यास सुरू करण्यात येणार असल्याने या अभ्यासक्रमाचा प्रत्येक दिवसासाठी देण्यात आलेली कृती कोविड नियम पाळून वर्कशिट देऊन सोडविण्यात येत आहे. प्रत्यक्ष मुलांच्या घरांपर्यंत गल्लीत, गटात जाऊन शिक्षक मार्गदर्शन करीत आहेत.
पाठ्यपुस्तके वाटप : प्रत्येक मुलाकडून मागील वर्षातील पुस्तके जमा करून घेण्यात आली असून, जमा पुस्तकातून चालू इयत्ता असणारी पुस्तके देण्यात आली आहेत.
दिव्यांग मुलांचे शिक्षण : विशेष गरजू मुलांच्या घरांपर्यंत विशेष शिक्षक पोहोचत आहेत. मुलाची गरज लक्षात घेऊन पालकांच्या मदतीने मुलांचे कौशल्य विकसित करण्यात येत आहेत. अतितीव्र व गृहाधिष्ठीत (होम बेस्डअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या मुलांना) थेरपी व दैनिक कौशल्य शिकविण्यात येत आहेत.